महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या खराब कामगिरीचं सत्र तेराव्या हंगामात कायम सुरु राहिलं आहे. शारजाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नईवर १० गडी राखून मात केली. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईचा हा सर्वात लाजिरवाणा पराभव मानला जातो. चेन्नईने विजयासाठी दिलेलं ११५ धावांचं आव्हान मुंबईने इशान किशन आणि क्विंटन डी-कॉक यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर पूर्ण केलं. सामना गमावल्यानंतर धोनीने हताश शब्दांमध्ये हतबलता व्यक्त केली.

“आमच्या संघासाठी काय गोष्टी बिघडत गेल्या हे आम्हाला तपासावं लागणार आहे. विशेषकरुन या वर्षाबद्दल बोलायला गेलं तर हे वर्ष आमचं नव्हतंच. तुम्ही ८ विकेटने सामना हरलात काय किंवा १० विकेटने याचा फारसा फरक पडत नाही. स्पर्धेत आम्ही आता ज्या जागेवर आहोत ते पाहून खरंच खूप वाईट वाटतं. दुसऱ्या सामन्यापासून आमच्या संघाचं सगळंच बिघडत गेलं. खराब कामगिरीची १०० कारणं देता येतील, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही यंदा आमच्या क्षमतेला साजेसा खेळ केलेला नाही. यंदा संघाला नशिबाचीही साथ मिळाली नाही.” सामना संपल्यानंतर धोनीने आपली प्रतिक्रिया दिली.

गुणतालिकेत तळातल्या स्थानावर फेकलेल्या गेलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी प्ले-ऑफची दारं आता जवळपास बंद झाली आहेत. यापुढे इतर संघांनी खराब कामगिरी केली आणि चेन्नईचा संघ उर्वरित तिन्ही सामने जिंकू शकला तरच प्ले-ऑफमध्ये त्यांना जागा मिळू शकते. परंतू १३ व्या हंगामात इतर संघांचा खेळ पाहता चेन्नई संघाला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळण्याची शक्यता मावळली आहे. मुंबईविरुद्ध सामना गमावल्यानंतर रविवारी चेन्नईसमोर विराट कोहलीच्या RCB चं आव्हान असणार आहे.