12 July 2020

News Flash

प्रतिमा लवचीकता

प्रतिमांची लवचीकता आपला अनुभव पोहोचवण्याकरिता मदत करतात.

प्रतिमांची लवचीकता आपला अनुभव पोहोचवण्याकरिता मदत करतात. त्यात संवेदनानुभव असतातच, पण त्यासोबत निर्माण होणाऱ्या भावभावनाही अगदी स्पष्टपणे समोर येण्यास त्यामुळे मदत होते व त्याद्वारे संकल्पना सूचित करणेही सोपे जाते..

 

या लेखमालेत ‘प्रतिमा संवाद’ या लेखात मी असं म्हटलं होतं की, आपण दैनंदिन भाषेत संवाद साधण्याकरिता शब्द वापरतो, बोली लिखित भाषा वापरतो; पण प्रत्यक्षात आपल्याला प्रतिमा वापरायच्या असतात. कारण प्रतिमांच्या द्वारे आपण दुसऱ्या व्यक्तीपर्यंत आपले अनुभव पोहोचवतो. त्यातून सह-अनुभूती, एकमत साध्य करण्याचा प्रयत्न करतो.
संवादामधील प्रतिमा आदान-प्रदान होताना आपण प्रतिमांना लवचीक काहीसं सैल बनवतो, वापरतो. हा लवचीकपणा बोली व लिखित भाषेप्रमाणेच दृश्यभाषेचाही एक अंगभूत गुण आहे. बोलीभाषेत शब्दांचा उच्चार, आवाज, बोलण्याची लय, व्याकरण, चेहऱ्याचे हावभाव, हातवारे आदींच्या साहाय्याने प्रतिमा लवचीक करून वापरतो. नाटक, सिनेमांतील संवादफेक किंवा काव्यवाचनात याचा अनुभव येतो. लिखित भाषेत याच गोष्टी आपण लिहून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. दृश्यभाषेत प्रतिमा लवचीक करून वापरणे याचं प्रचंड महत्त्व आहे. कारण नाही तर चित्रकला, अबकडच्या तक्त्यातील चित्रांप्रमाणे चित्र दाखवेल.
टीव्ही, इंटरनेट, गुगलसारखी सर्च इंजिन, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप सारखे अ‍ॅप अशा तंत्रज्ञानामुळे, आपण गेल्या १० वर्षांत प्रचंड प्रमाणात प्रतिमांना पाहत आहोत, त्यांना प्रतिसाद देत आहोत. त्यांचा आपल्यावर परिणाम होतोय. (त्या प्रतिमांत स्थिर प्रतिमाही आहेत तसेच व्हिडीओही आहेत.) त्या आपल्याला आनंद देतात, वैताग देतात, त्यांचा कंटाळा येतो. त्यामुळे आपण सुखावतो इ. थोडक्यात आपल्या नकळत आपली प्रतिमांची भूक वाढलीय. पाहा की ‘सेल्फी’चं वेड किती आहे पसरलेलं! पण ते असो.. या रोजच्या प्रतिमांच्या आहारात अनेक लवचीक प्रतिमा आपण पाहत असतो. त्यांच्या आधारे आपण दृश्यभाषेतील प्रतिमांचा लवचीक वापर समजून घेऊ या. त्यानंतर चित्रकार त्यांचा वापर कलेत कसा करतात ते पाहू.
प्रतिमांची लवचीकता आपला अनुभव पोहोचवण्याकरिता मदत करतात. त्यात संवेदनानुभव असतातच, पण त्यासोबत निर्माण होणाऱ्या भावभावनाही अगदी स्पष्टपणे समोर येण्यास त्यामुळे मदत होते व त्याद्वारे संकल्पना सूचित करणेही सोपे जाते.
दृश्यभाषेत, दोन किंवा जास्त प्रतिमा बाजूबाजूला मांडणे व त्यातून त्यातील संबंध सूचित करणे, त्या प्रतिमांचे भाग जोडून एक नवीन प्रतिमा बनवणे, एका प्रतिमेचं साधम्र्य दुसऱ्या प्रतिमेशी दर्शवणे, एका प्रतिमेतून दुसरी प्रतिमा उगवणे, प्रतिमा खूप अस्पष्ट करणे, आकारमान बदलणे, रंग, पोत बदलणे, एक प्रतिमा दुसऱ्या प्रतिमेची सावली म्हणून वापरणे अशा अनेक प्रकारे चित्रकार प्रतिमांना लवचीक करून वापरतो. प्रतिमांना भावना व संकल्पनांचा धारक बनवतो.
काही दिवसांत गणेशोत्सव चालू होईल. उत्सवादरम्यान किंवा त्याआधी बाजारात उपलब्ध असणाऱ्या गणपती मूर्ती पाहा. गणपती मूर्ती ही आपल्या समाजातील एक आवडती प्रतिमा आहे. या प्रतिमेला ज्याला जसं शक्य होईल तसं प्रत्येक जण लवचीक करून वापरतो. म्हणजे काही कलाकार कुठच्याही व्यक्तीचं नाव लिहून गणपतीचा आकार तयार करतात. लग्नपत्रिकांवर फक्त काही रेषा व आकारांची मांडणी अशी केली जाते की, त्यामुळे गणपतीचा आकार दिसेल.
गणपतीच्या मूर्तीत आपण कधी त्याला बालक रूपात पाहतो, तर कधी प्रौढ म्हणून. आतापर्यंत बालगणेश या कार्टून कॅरेक्टरसह शिवाजी, स्वामी समर्थ, विष्णू, कृष्ण, राम, विठोबा अशा कित्येक रूपांत आपण त्यांना बनवलं आहे. गेल्या वर्षांपासून खंडोबाच्या रूपात म्हणजे टीव्ही सीरियलमधील खंडोबासारखा बसलेला फार लोकप्रिय झालाय. या वर्षी ‘बाहुबली’ सिनेमातील नायकाप्रमाणे, पारंपरिक गणेशाची देहयष्टीपेक्षा, फाइव्ह पॅक दर्शविणारे गणेश रूप या वर्षी पाहायला मिळतंय. कोणी म्हणेल, हा कल्पनाशक्तींचा वापर आहे! यात प्रतिमांचा लवचीकपणा तो काय?
पण इथे हे लक्षात घ्यायला हवं की, या उदाहरणांत एका प्रतिमेच्या रूप व भावासह दुसरी प्रतिमा पाहण्याची इच्छा इथे दिसून येते. या इच्छेमुळे कल्पनाशक्तीच्या साहाय्याने वैचारिक पातळीवर लवचीकता दर्शविली जाते. वैचारिक लवचीकतेमुळे पारंपरिक, शास्त्रशुद्ध गणेशरूपात काय व कसा बदल करावा या दिशेने विचार सुरू होतो. या दिशेने होणारा विचार लवचीक प्रतिमा निर्माण करण्याच्या दिशेने जातो.
आपण जेव्हा अर्कचित्र (कॅरिकेचर) पाहतो तेव्हाही अशाच प्रकारे लवचीक बनवलेली प्रतिमा पाहत असतो. परिणामी व्यक्तीचा चेहरा, शरीर, कपडे, केस, चेहऱ्याचा एखादा भाग आदी गोष्टींची प्रमाणबद्धता बदललेली पाहायला मिळत असते. अ‍ॅनिमेशन फिल्मस्मधील अनेक कॅरेक्टर्सही अशाच प्रकारे लवचीक प्रतिमांचं दर्शन घडवतात. डिस्नेच्या अल्लादिन सिनेमातील जिनी, क्लेमेशनमधील अजरामर ‘पिंगू’ पेंग्विन, एड्-एड अँड एडी अशी कित्येक कॅरेक्टर्स या प्रकारात मोडतात.
आता लवचीक प्रतिमेतून संकल्पना कशी स्पष्ट होते ते पाहू या. ‘बाहुबली’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका प्रतिमेला लवचीकपणे वापरून, सामाजिक स्थितीवर भाष्य करणारी प्रतिमा तयार झाली.
सिनेमात असं दर्शवलं गेलंय की बलवान, बलदंड बाहुबली, दगडाचं त्याच्या उंचीइतकंच व त्याच्या वजनाहून बरंच जड असं दगडाचं शिवलिंग खांद्यावर घेऊन चाललाय, काहीशा कष्टाने..
मधल्या काही दिवसांत लाल कांदा, घरगुती वापराचा गॅस सिलेंडर यांचा भाव वाढला. तो सामान्य माणसाला परवडेनासा झाला. त्याच महिन्याच्या खर्चाचं गणित बिघडलं, आर्थिक भार असहय़ झाला. कोणी केली माहीत नाही, पण बाहुबलीची अशी प्रतिमा तयार झाली, ज्यात तो शिवलिंगाऐवजी लाल कांदा किंवा सिलेंडर खांद्यावर घेऊन चालतोय. ही प्रतिमा लोकप्रिय झाली. कारण प्रतिमा लवचीक झाल्याने भार, ‘आर्थिक भार’ याचा अनुभव ती स्पष्ट करू लागली. बाहुबली सामान्य जनतेचा प्रतिनिधी झाला. शिवलिंगाची जागा कांदा व सिलेंडरने बदलून हे शक्य झालं. अशा प्रतिमेचा विचार कल्पनाशक्तीनेही सुचू शकतो. जीवनातील विसंगती जाणवत राहिल्याने सुचू शकतो किंवा आर्थिक भार या संकल्पनेचा विचार व त्याची अभिव्यक्ती यामुळेही सुचू शकतो. एकदा ही प्रतिमा सुचली की लाल कांदा हिऱ्याच्या जागी बसवून, एंगेजमेंट रिंगही बनवायचं सुचू शकतं.
आज आपण खास चित्रकलेतील उदाहरणं न पाहता दृश्यभाषेच्या लवचीकता या गुणाची चर्चा केली. (म्हणजे लोकप्रिय, जाहिरातवजा वापरल्या जाणाऱ्या प्रतिमांचा वापर करून) पुढच्या वेळी दृश्यकलेतील त्याचा वापर पाहू.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2015 12:57 am

Web Title: portrait flexibility
Next Stories
1 अदृश्य = अमूर्त (?)
2 कळण्याची दृश्य-वळणे : वेध अमूर्ताचा
3 कळण्याची दृश्य-वळणे
Just Now!
X