कामाठीपुरा वेश्यावस्ती. सकाळचे आठ म्हणजे इथली पहाटच. दुकानदाराने हाकलल्याने अंगावरचं फडकं घेऊन संडासाच्या शोधात निघालेलं एक पोरगं कचऱ्याच्या पेटीजवळ अचंबित होऊन थांबलं होतं. मीही त्याच्याजवळ थांबलो. कचऱ्यात फडक्यात अर्धवट गुंडाळलेलं एक नवजात अर्भक पडलेलं होतं. फडक्यावर व उघडय़ा अंगावर माशा बसल्या होत्या. ते जिवंत वाटत होतं पण हालचाल नव्हती आणि ते रडतही नव्हतं.. कोणीतरी पहाटे केलेलं हे काम होतं. कारण इथे रात्री जाग असते. आम्ही ते बाळ उचललं. पुढे कायदेशीर सोपस्कार करताना खरी आई, सरस्वती समोर आली व तिनं बाळाचा ताबा घेतला. ‘‘मुलगी झालीय. माझ्याबरोबर राहिली तर वयात आली की लगेच घरवाली तिला धंद्याला लावील म्हणून टाकून आले.’’ सरस्वतीनं खुलासा केला. चिखलात सापडली म्हणून मुलीचं नाव ठेवलं कमल.

पूर्वी मुंबईच्या रेडलाइट एरियात फर्मानानुसार पोलीस ठाण्यावरून नियमित अकारण लाठीचार्ज होई आणि बायका काळ्यानिळ्या होईस्तो चोपल्या जात. एकदा या विरोधात आम्ही एका सुसंस्कृत वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटलो. बायकांशी संवाद करायला बोलावलं. एका जनसंपर्क अधिकाऱ्याला घेऊन तो आला. दोनशे बाया हजर झाल्या व त्यांनी आपली गाऱ्हाणी मांडली. एकीने साडीवर केली. अधिकारी दचकला. तिच्या मांडीवर लाठय़ांचे काळेनिळे वळ होते. काही ठिकाणी मांस लोंबत होतं. मग बायांमध्ये आपापले वळ दाखवण्याची एकच चढाओढ लागली. त्या गर्दीत सरस्वती कमलचा हात धरून उभी होती. काही बायांनी सरस्वतीला पकडलं, ‘‘तू दाखीव सर्वात जास्त मार तुलाच बसलाय.’’ त्या मागे लागल्या. सरस्वतीने ठाम नकार दिला. मी बाजूला उभा होतो. माझ्याकडे वळून म्हणाली, ‘‘सभ्य माणसांसमोर असं वागायला शरम वाटते. रोज रात्री आम्हा बायकांना बिनओळखीच्या अनेक पुरुषांसमोर उघडंनागडं व्हावं लागतं. त्यांना पहावं लागतं. त्यांचं कौतुक करावं लागतं. आम्ही साऱ्याचजणी म्हणतो, ‘आमचं मन केव्हाच मरून गेलंय’ पण तसं असतं तर हा अपमान मनाला रोज नव्यानं झोंबत का राहिला असता? हा पोलीसवाला त्याच्या कामासाठी आलाय. दोन बायांनी लाठीच्या जखमा दाखवल्या तेवढं पुरे. तेवढय़ाने त्याला सगळ्या जखमा कळतील.’’ मग तिच्यासोबतच्या सहा-सात वर्षांच्या कमलकडे बघत ती म्हणाली, ‘‘हे सगळं कमलनं मला शिकवलं. मला म्हणाली, ‘आई तू मात्र असं नको करूस.’ ही दिसते लहान पण मोठी समज आहे हिला.’’ कौतुकानं तिच्या गालाला चिमटा काढीत सरस्वती म्हणाली.

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?

डीसीपीने पोलिसांचा मार थांबवला. दोन वर्ष बरी गेली. मग एक दिवस डीसीपी बदली होऊन गेला.. पोलीस ठाण्याचा पीआयदेखील बदलला. नवीन पोलीस निरीक्षकानं आल्या आल्या पुरुषार्थ दाखवला. मुख्य रस्त्यावरच बायांना चोपायला सुरुवात केली. त्यात सरस्वतीच सापडली. आम्ही तिला आणायला गेलो तर रक्तानं थबथबलेली. दोन्ही हाताला फ्रॅक्चर झालं होतं. सरस्वतीनं बायांना एकत्र केलं. पोलीस मुख्यालयापर्यंत तक्रारी गेल्या. पोलीस निरीक्षकाची बदली झाली; पण सरस्वती घाबरली. म्हणाली, ‘‘कमलीचं काही बरवाईट करतील. तिला आत इथून हलवा. कुठेतरी सुरक्षित जागी ठेवा.’’ कमलला आम्ही मुंबईतल्या एका आश्रयगृहात हलवलं. सरस्वती आणि कमल दोघींना खूप दु:ख झालं.

आश्रयगृहात कमल स्थिरावली. आम्ही जवळून पाठपुरावा केला. प्रत्येक भेटीत तिकडच्या सुपरिटेंडेंट कमलचं कौतुक करीत. एक गोष्ट सांगायला कधीच विसरत नसत. कमल कधीच रडत नाही. आपटलं, धोपटलं, कापलं, भाजलं तर नाहीच नाही. खरंतर या मुलींवर रोजच आभाळ कोसळत असतं. तरीपण ही रडत मात्र नाही. हे अनैसर्गिक नाही वाटत?

‘अति शोक केल्यानं अश्रूपिंड कायमची सुकून जात असतील कदाचित.’ मी म्हणायचो.

जमेल तितकी सावधानता बाळगूनही सरस्वतीला गिऱ्हाइकाने एचआयव्ही दिला. ती झपाटय़ाने खालावली. बघता बघता मरून गेली. मरायच्या आधी व मेल्या मेल्या कमल तिला भेटून गेली होती. शोकापायी कमलच्या हृदयात दु:ख होतं; पण डोळ्यांत पाणी मात्र नव्हतं.

‘‘कमल थोडी रडलीस तर हलकं वाटेल.’’ – मी तिला सुचवलं.

‘‘चुकीच्या जगात चुकीचा जन्म घेतलाय. फक्त दिसायला ही माणसं दिसतात. खरंतर हे माणसांचं जगच नव्हे सर. इथे रडून अश्रू वाया का घालवा?’’ वयाला न साजणारं शहाणपण होतं तिच्याकडे.

आश्रयगृहात वाढता वाढता कमलला सतरा वर्ष झाली. बघता बघता ती अठरा वर्ष पूर्ण करणार होती. त्यानंतर तिला बालक म्हणता येणार नव्हतं. तसं झाल्या झाल्या शासन तिच्याबाबतची सर्व जबाबदारी झटकून टाकायला मोकळं होणार होतं. तिचं शिक्षण पूर्ण झालं नव्हतं. तिला बाप केव्हाच नव्हता. आई वारली होती. राहायला घर नव्हतं. नातेवाइकांचा पत्ता नव्हता. असं असलं तरी ती राहात असलेलं आश्रयगृह सोडणं भाग होतं. पुढची व्यवस्था करण्यासाठी आम्ही तिच्या आश्रयगृहाच्या भेटी वाढवल्या. सतरा वर्षे पूर्ण केलेल्या मुलींसाठी आम्ही आमच्याच होममध्ये एक स्वतंत्र फ्लॅट बनवला आहे. तिथे अशा पाच सहा मुलींचा गट ठेवतो, त्यांना दरमहा एक ठरावीक रक्कम देतो व स्वत:चं आयुष्य स्वत: संभाळायला मदत करतो. जोडीला व्यावसायिक प्रशिक्षण देतो. कमल यातून पार झाली. एंड टर्म मूल्यांकनात सर्व निकषांवर कमलचा परफॉर्मन्स उत्कृष्ट होता. पुढच्या टप्प्यात आम्ही ५ मुलींसाठी शहरात एक भाडय़ाची खोली पाहिली. जागेची डागडुजी केली व मुलींना ताबा दिला. कमलने यात खूपच पुढाकार घेतला. एक वर्षांचा हा प्रकल्पही तिने यशस्वी केला.

मग कमल भेटायला आली. म्हणाली, ‘‘आता पुरेसा आत्मविश्वास जमलाय. पुढच्या टप्प्यात तुम्ही काही मदत करू नका. मीच करीन सर्व काही.’’ म्हटल्याप्रमाणे तिने चार कमावत्या मुलींचा गट जमवला, एका रेल्वे स्टेशनजवळ भाडय़ाची खोली शोधली, करार केला, ताबा घेतला. शेजारच्या कुशंकित लोकांशी चांगले संबंध बनवले. त्यांची कुरकूर कौतुकात बदलली.

एकदा आम्ही तिला भेटायला गेलो. मुळात कृश प्रकृतीची कमल जगण्याच्या धडपडीत पार झडली होती. भिंतीवर सरस्वतीचा फोटो होता व त्याला ताजा हार होता. ‘‘या ग्रुपमध्ये आम्ही चार जणी आहोत. कामावर सतत उभं राहावं लागतं. पाच मिनिटं बसायला मिळत नाही. आठ तास म्हणतात; पण किमान १० तास काम करवून घेतात. घरी येऊन बऱ्याचदा जेवण करणं होत नाही मग बाहेरचं ऑर्डर करून खावं लागतं. पण तसं केलं की बजेटमध्ये गडबड होते. सर्व मेंबर्स नीट टिकून राहतातच असं नाही. त्यांचेही प्रॉब्लेम्स असतात ना. कधीकधी एखादी मुलगी तीनतीन महिने पैसेच देत नाही. त्यांचं पण बरोबर आहे. नोकरी काय आज आहे उद्या नाही परवा आहे तेरवा नाही. आपण सांभाळून घेतलं नाही तर त्यांचं कसं होणार? शेजारच्या घरातून वीज घेतलीय. जपून वापरावी लागते. नळाला पाणी रात्री दोन तास येतं. आम्ही आमच्यात पाळ्या लावतो. वेळ चुकवून चालत नाही.’’

एका खिडकीपासून दुसऱ्या खिडकीपर्यंत पोहोचलेल्या दोरीवर कपडय़ांचा ढीग लटकत होता. मी त्याकडे पाहिल्यावर कमलने खुलासा केला, खोलीचा मालक खिळे ठोकू देत नाही त्यामुळे कपडे सुकवायला दोरी लावता येत नाही.

एक दिवस कमलनं जाहीर केलं की तिचा एक बॉयफ्रेंड आहे. आम्ही त्याला भेटलो. बरा दिसला. कमलनं लग्न केलं. ग्रुप होम दुसरीच्या ताब्यात दिलं व स्वत:ची खोली घेऊन संसार करू लागली. दोन वर्षांनंतर नवरा मारहाण करू लागला. नोकरीत त्याचं लक्ष नव्हतं. दोन वर्षांत कमलचं लग्न मोडलं. नवी मुंबईत एकटीनं खोली घेणं शक्य नव्हतं. कमलने पुन्हा एक ग्रुप बनवला. नव्यानं घर उभं केलं.

कमल केव्हाच रडली नव्हती हे अनेकांना माहीत झालं होतं; पण कमलला आम्ही किंवा कोणीच कधी हसतानादेखील पाहिलं नव्हतं ते पहिल्यांदा लक्षात आलं. आज मात्र प्रत्येक अडचण ती हसत हसत सांगत होती. तिची कशाचबद्दल तक्रार नव्हती. तिला विचारलं, ‘‘रोजच्या जगण्यात एवढे सारे कष्ट असून तू हसतेयस हे कसं बरं?’’

विचार करून म्हणाली, ‘‘खरंय, पहिल्यांदा मी हसतेय. आयुष्यात पूर्वी कधीच हसले नव्हते. हसण्यासारखं काही मिळालंच नव्हतं. रडलेपण नव्हते. रडायला मला आवडत नाही. रडायला कोणाला आवडतं? मला सरस्वती आई आठवते. खूप अपमानाचं जगली आणि मेली. तिच्या आणि तिच्या बरोबरीच्या बायांच्या जगण्याला माणसाची प्रतिष्ठा नव्हती. मला प्रतिष्ठा हवी आहे. माझ्यावर कोणी जबरदस्ती करत नाही. खोली छोटी असली, शेअर करत असले तरी हे माझं घर आहे. म्हणून हसते. लग्न मोडल्याचं दु:ख कोणाला होणार नाही बरं? पण करायचं काय? नवऱ्याचा मार का म्हणून खायचा? मी कमावते, कोणाजवळ हात पसरावे लागत नाहीत. मला परत लग्न करावंसं वाटेल की नाही माहीत नाही. महागाई रोज वाढते. पगार वर्षांकाठी थोडासा वाढतो. ट्रेन्स खचोखच भरलेल्या असतात. रस्त्यावर चालायला जागा नसते. रोजच जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागतो. किडय़ामुंग्यासारखी माणसं मरतात. आणि जगतात. आजूबाजूला खूप गोंगाट असतो. जागोजाग मवाली पोर टिंगलटवाळ्या करत बसलेली असतात. सगळंच तर तक्रार करण्यासारखं आहे. हे शहर लौकिक कमावलेल्या लोकांचं आहे म्हणे. त्यांनी माणसांचं हे काय करून टाकलंय सर? रडायचं म्हटलं तर किती काही आहे या जगात. मग रडूच येत नाही मला.’’

ती शांत राहिली. मी ही बसून राहिलो.

मग अचानक तिचं अंग गदगदल्यासारखं हलायला लागलं.. ‘‘कचऱ्याची पेटी खूप लागून राहिलीय मला सर. आणि माझ्या आईच्या अंगावरचे वळ पण. खूप लागून राहिलंय सर. ते काही केल्या जात नाही..’’

मग कमल रडू लागली. ढसाढसा!

डॉ. प्रवीण पाटकर

pppatkar@gmail.com

chaturang@expressindia.com