|| डॉ.कुमार सप्तर्षी

मी बी.एस्सी. झालो १९६१मध्ये. महाविद्यालयीन जीवनाचा अनुभव म्हणजे १९५७ ते १९६१. आमच्या काळात मुलींना सामाजिक भान असणं ही गोष्ट तशी दुर्मीळ बाब. मुलीचे सद्गुण म्हणजे काय.. तर उत्तम स्वैपाक करता येणं अन् एखाद्या सहलीत भेंडय़ांच्या कार्यक्रमात गाणं म्हणणं. नगरच्या कॉलेजमध्ये सर्वात मॉड मुलगी म्हणजे शॉर्टस् घालून टेबल टेनिस खेळणारी. कारण तशा प्रतिमा समाजमानसात त्या काळात अस्तित्वात नव्हत्या. स्वयंपाक न येणारी स्त्री म्हणजे गृहिणीपदासाठी नापास! गृहिणी नसलेली स्त्री बहकलेली, चंचल आणि चारित्र्याबाबत निसरडी असणारच अशी खात्रीच असायची.

Palestine-Israel, Somaiya School,
पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षासंदर्भात पोस्ट : मुख्याध्यापिकेला लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश, सोमय्या शाळेच्या व्यवस्थापनाकडून आदेश
AMU gets its first woman VC Naima Khatoon
व्यक्तिवेध : नईमा खातून
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात

आमच्या कॉलेजमधील एक प्राध्यापिका रोज लिपस्टिक लावून यायच्या. वर्गातील खेडोपाडीच्या मुलांनी इतक्या लालेलाल ओठांची बाई आयुष्यात कधी पाहिलेलीच नसायची. चेहऱ्याला हाताच्या पंजाचा आधार देऊन, बाकावर कोपर रुतवून, मॅडमच्या चेहऱ्याकडे (विशेषत: त्यांच्या ओठांवर) फोकस करून विद्यार्थी तास संपेपर्यंत बघत बसायचे. मॅडमबद्दल बाहेर कोणी फालतू बोलायचे नाहीत. पण त्या वेगळा नमुना म्हणून त्याचं आकर्षण वाटे. खेडय़ात कुणाही स्त्रीशी बोललं की प्रथम ती लाजणार. त्यालाच शालीनता म्हणण्याचा प्रघात होता. ‘आमची पोरगी खाली मान घालून नाकासमोर चालते’, हे अभिमानाने सांगितले जाई. स्त्रीला जगाची माहिती नसणे हाच तिचा मोठा गुण मानला जाई.

मराठवाडय़ात शैक्षणिक मागासलेपण होते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादला प्रचंड मोठा मिलिंद महाविद्यालयांचा परिसर उभा केला. त्या आधारामुळे मराठवाडय़ात पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य तरुणांचे शिक्षण इतरेजनांपेक्षा पुढे गेले. इतरांसाठी महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे पुणे, नागपूर किंवा हैदराबाद इथं जावं लागे. १९७०च्या आसपास देगलूर, उदगीर, लातूर, औरंगाबाद, बीड अशा ठिकाणी महाविद्यालये सुरू झाली. त्यामुळे बहुजन शिकू लागले. दलितेतरांनी मिलिंद कॉलेजमध्ये जायचंच नाही, असा निर्धार केला होता. ठिकठिकाणी महाविद्यालये निघाल्यानंतर त्यात मुली प्रवेश घेऊ लागल्या. त्यातल्या बहुसंख्य मुली दलित असायच्या. कारण बाबासाहेबांचा वैचारिक प्रभाव. मराठवाडय़ात सरंजामशाही मनोवृत्ती, पाटीलशाही, गावगाडा या बाबी ठसठशीत होत्या. बऱ्याच ठिकाणी ‘युक्रांद’ या संघटनेमुळे मुलांना नव्या मूल्यांची ओळख झाली. आम्ही सांगायचो, ‘स्त्री ही वस्तू नसून व्यक्ती आहे.’ हे वाक्य मुलींना आवडायचे, पण चमत्कारिक वाटायचे.

‘युक्रांद’ने आपल्या शिबिरात या अनुभवांचा विचार केला. डॉ. राम मनोहर लोहिया यांचे स्त्रीविषयक विचार तरुणांच्या मनाला भिडत. त्या काळात स्त्रीविषयक अचूक मांडणी केली ती आचार्य दादा धर्माधिकारी या गांधीवादी विचारवंतांनं. आमच्या शिबिरात त्यांचे व्याख्यान हमखास असे. स्त्रीचे आत्मभान तेव्हा जवळपास नगण्य पातळीवर होते. ते कसे बदलत गेले याचे आम्ही साक्षीदार आहोत. स्त्री-पुरुषांनी एकत्र सामाजिक काम करणे ही आता सर्वमान्य गोष्ट आहे. ग्रामीण भागातसुद्धा एखाद्या संघटनेचे कार्यकत्रे सोबत स्त्री-कार्यकर्त्यांना घेऊन आले तर कुणाला आश्चर्य वगरे वाटत नाही. ‘युक्रांद’मध्ये मुली मोठय़ा प्रमाणात असत. म्हणून आम्हाला ‘लग्न जमविणारी संघटना’ म्हणून विरोधक बदनाम करीत.

एक स्टडी केस म्हणून सांगतो. बीड येथे सुशीला मोराळे नावाची एक प्राध्यापक आहे. बीडच्या बंकटस्वामी महाविद्यालयात ‘युक्रांद’तर्फे एक विद्यार्थी आंदोलन झालं. तेव्हा सुशीला नावाची १७-१८ वर्षांची तरुणी खूप आक्रमक भाषण करायची. वेळप्रसंगी पुरुषांसारख्या शिव्या देऊन विद्यार्थी वर्गाला चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करायची. स्वत:ला मर्द मानणाऱ्या मुलांना ती मुर्दाड म्हणून हिणवायची. तिचे निराळे गुण नीट समजून घेण्यासाठी तिच्याबरोबर मी आवर्जून संवाद साधला. तिला ‘युक्रांद’ची तत्त्वे चांगलीच पटली होती. त्या वयात ती चप्पल घालत नसे. तेव्हा मी तिला सांगितले की, ‘‘सुशीला, पायात चप्पल घालत जा.’’ मुलींनी पायात चप्पल घालावी असे ती ज्या गावातून, ज्या वस्तीतून, ज्या जातिसमूहातून आली होती, त्यापकी कुणीच तिला आजवर सांगितले नव्हते. त्या समाजात कोणतीही स्त्री चप्पल घालत नसे म्हणे. स्त्री म्हणून परिस्थितीने तिच्यावर लादलेला संकोच ‘युक्रांद’मध्ये आल्यानंतर आपोआप गळून पडला. सामाजिक जीवनात प्रवेश केल्यावर तिच्यात जन्मजात असलेला अस्सल आक्रमकपणा आंदोलनाला उपयोगी पडू लागला. ती पुरुष सहकाऱ्यांना बदलण्याबद्दल आक्रमक बनली. जनार्दन तुपे हा मराठा समाजातला युक्रांदीय. त्याला सुशीलाने भाऊ मानले होते. जनार्दन त्याच्या बायकोला जाता येता अगदी सहजपणे मारायचा. सुशीलानं एकदा माझ्या अध्यक्षतेखाली कोर्ट भरवलं, त्यात हा विषय चच्रेला घेतला. मी त्याला विचारलं, ‘‘तू बायकोला मारहाण करतोस हा आरोप खरा आहे काय?’’ तो म्हणाला, ‘‘आमच्या खेडय़ात प्रत्येक नवरा खुशीत, रागात किंवा दोन्हीपकी काहीही नसताना बायकोला मारण्यात आनंद घेतो. ‘युक्रांद’मध्ये मी हे प्रथमच ऐकतोय. मला वाटायचं की बायकोला मारणं ही जगाची रीत आहे. तो नवऱ्याचा मर्दपणा आहे. म्हणून मी माझ्या बायकोला मारतो. त्यात माझी काय चूक?’’ सांगोपांग चर्चा होऊन ठराव संमत झाला की, ‘जनार्दननं त्याच्या पत्नीला कधीही कोणत्याही प्रसंगात मारहाण करू नये. त्याने तसे केल्यास त्याला ‘युक्रांद’ सोडावे लागेल. कारण मारहाण करणे म्हणजे स्त्रीचा आत्मसन्मान ठेचून काढणे.’ त्याने ठराव मान्य केला. या निकालानंतर सर्वजण समुदायाने त्याच्या घरी गेले. त्याच्या बायकोच्या हातचा चहा प्यायले. तिला युक्रांदीयांचा ठराव समजून सांगितला. त्यावर ती म्हणाली, ‘‘मला काही गर वाटत नव्हतं. कारण माझा बाप आईला नेहमी मारायचा. पण आता मला मारहाण होणार नाही याचा मात्र मला आनंद वाटतोय.’’ त्यांच्या संसारात त्यानंतर संवाद सुरू झाला. स्त्री-पुरुष समानतेचे नाते मानल्यामुळे जनार्दनचाही विकास झाला. कालांतराने तो आमदार म्हणून बीड जिल्ह्य़ातील चौसाळा मतदार संघातून निवडून आला.

माढय़ाचा युक्रांदीय तरुण अनंत शिंदे याची वेगळी कहाणी. त्याला मुलगा हवा होता आणि ‘युक्रांद’चा फुलटाईमर बनायचं होतं. एक मुलगा झाला की तो नोकरी सोडून देणार होता. पण लागोपाठ चार मुली झाल्या. पाचवा मुलगा. तोपावेतो आयुष्य हातातून निसटलं. म्हणून तो मुलींचा रागराग करायचा. सतत त्यांच्यावर चीड चीड करायचा. त्याने मुलींची लग्ने त्यांच्या अल्पवयात केली. त्यावरून त्याने आमची बोलणी खाल्ली. तेव्हा तो म्हणाला, ‘‘मुलींशी कसे वागावे हे आमच्या घरात वा आमच्या समाजात कुणी कधी सांगितलेच नाही. मुलगी झाली म्हणून दु:ख मानायचे नसते हे मला आधीच ‘युक्रांद’ने शिकविले असते तर मी असा वागलो नसतो.’’ त्यानंतर संघटनेच्या शिबिरात ‘लेकरांशी कसं वागावं’ या विषयाची भर पडली.

ग्रामीण भागातील व शहरातील मानसिकता वेगळी असते. त्यांचे अग्रक्रमाचे प्रश्नही वेगळे असतात. काही असो, मूलत: स्त्रीला आत्मभान देणे हे सर्व चळवळींचे कर्तव्यच आहे. परिस्थितीचे संदर्भ भिन्न असले तरी आत्मभान आल्यानंतर स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळा आकार येतो. काही वेळा त्याचा गरवापर होतो. एका शहरातल्या मत्रिणीचे उदाहरण. तिचा प्रेमविवाह झालेला. दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी गांधीवादी. स्त्री-मुक्ती चळवळीचा स्पर्श झाल्यानंतर तिने उगाचच आग्रही भूमिका घ्यायला सुरुवात केली. नवरा गाडी वापरतो. मग त्यात तिलाही समान वाटा पाहिजे होता. नवऱ्याने ते मानलं. तो कंपनीत उच्चपदावर नोकरी करणारा. तो नोकरी धरण्यापूर्वी ‘दोन गाडय़ा हव्यात’, अशी अट कंपनीला घालायचा. तिने पुढे एक स्त्रीवादी संघटना काढली. त्या संघटनेचा मुख्य कार्यक्रम आपला नवरा कसा पुरुषप्रधानतेचा अर्क आहे (मेल शॉव्हिनिस्ट पिग) हे स्पष्टपणे व जाहीररीत्या आपल्या स्त्रीवादी गटात सांगणे, हा होता. प्रत्यक्ष घरात तिचे आणि नवऱ्याचे नाते सुसंवादी व मेळ बसणारे होते. तरी स्त्रीवादी नेता असल्यामुळे ती नवऱ्याबद्दल काहीबाही रचित गोष्टी सांगायची.

आणखी एक कहाणी. ‘युक्रांद’मध्ये शैला व राम सातपुते यांचा प्रेमविवाह झाला. राम दलित समाजातला. शैला सारस्वत समाजातून आलेली. विवाह होण्यापूर्वीच दोघे जातिमुक्त झालेले. मुलांवरही तसेच संस्कार झाले. काही काळानंतर राम एका आजारात वारला. आत्मभान जागे असल्यामुळे शैलाने आपले सामाजिक काम सोडले नाही. मुलगा कट्टर गांधीवादी बनला. आय.टी.क्षेत्रात उच्च पदावर पोचला. चांगले पसे कमावू लागला. तो आईच्या सार्वजनिक जीवनात काही विसंगती आढळली की आईला परखडपणे प्रश्न विचारतो, ‘‘आई, तुला परिस्थितीनुरूप गांधीवादाशी तडजोड करायची होती तर मला त्या संस्कारात का वाढवलेस?’’ वास्तविक तिने तशी मूल्यांशी तडजोड केलेली नव्हती. फक्त तिने मुंबईच्या काँग्रेस महिला आघाडीचे अध्यक्षपद स्वीकारले होते. मुलाच्या नजरेत तीच तडजोड होती. कारण त्याच्या मते, काँग्रेस पक्ष गांधीवादी राहिला नव्हता. स्त्रीला आत्मभान आले, त्यानुसार तिने जीवनसाथी निवडला आणि काही मूल्ये प्रत्यक्ष आचरणात आणली, तर ती पुढच्या पिढीत निश्चित संक्रमित होतात. शेवटी मुलांवर खरे संस्कार आई या नात्याने स्त्रीच करते. म्हणून तिचा बौद्धिक व नतिक विकास गरजेचा.

‘युक्रांद’स्थापन होण्यापूर्वी पुण्यात ‘युथ ऑर्गनायझेशन पुणे’ या नावाची संघटना आम्ही स्थापन केली होती. १९६५ मध्ये. पुण्याच्या महाविद्यालयातील सर्व क्षेत्रात सक्रिय असलेले तरुण-तरुणी या संघटनेत सहभागी झाले होते. नारायण पेठेतील एका वाडय़ाच्या गच्चीवर आम्ही जमायचो. तरुण-तरुणींची संख्या जवळपास समान असायची. नेतृत्व निश्चित झाले नव्हते. सगळा प्रकार उत्स्फूर्त असायचा. कोणत्या दिवशी कशावर चर्चा होईल याचा अंदाज नसायचा. मी आणि अनिल अवचट तिथे रोज नित्यनेमाने हजर असायचो. महाविद्यालयीन मुलींना त्या चर्चामधून व खुल्या संवादातून आगळेवेगळे समाधान लाभायचे. मग त्या त्यांच्या मत्रिणींना संघटनेत आवर्जून आणत. त्या गटामध्ये चतन्य व ऊर्जा ओतप्रोत भरलेली असायची. संघटनेतले तरुण मुलींशी सौजन्याने वागतात अशी माहिती कर्णोपकर्णी पसरत होती. चर्चा जशी सामुदायिक व्हायची तशी एका-दोघांतही व्हायची. ऊर्मिला सराफ ही त्यातली एक खिदळत हसणारी आकर्षक अन् बुद्धिमान मुलगी. ती लॉ कॉलेजमध्ये शिकत होती. तिने मला बाजूला घेऊन विचारले की, ‘तुझी जात कोणती?’ मी शांतपणे उत्तर दिले, ‘माझा जन्म नावाचा अपघात ब्राह्मण कुटुंबात झालाय. मी मात्र भारतीय आहे. मला जात नाही.’ त्या उत्तरावर ती चकित झाली. त्या काळात ती रोमँटिक कविता करायची. मला दाखवायची. मी मात्र सामाजिक विषमता, स्त्री-पुरुष समानता, दारिद्रय़ या विषयांवर बोलायचो. ती श्रीमंत घरातील असल्यामुळे तिला गरिबी ठाऊक नव्हती. युथ ‘ऑर्गनायझेशन’तर्फे आम्ही झोपडपट्टीत साप्ताहिक दवाखाने चालवायचे. तिला समाजाचे वास्तव दर्शन होऊ लागले. तिचे आत्मभान जागे झाले. आमच्यात खूप चर्चा व्हायच्या. पुढे तिला या सामाजिक चर्चाची आणि प्रश्न सोडवण्याच्या कृतीची गोडी लागली. हे गोड दिवस आयुष्यात कायम ठेवायचे असतील तर विवाहबद्ध होणे आवश्यक होते. मी पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता व्हायचे ठरवले होते. एका सामाजिक कार्यकर्त्यांला जपणे, बळ देणे हेदेखील परिवर्तनाच्या प्रक्रियेत मोठे योगदान आहे, अशी तिची मनोधारणा झाली. त्याप्रमाणे ती त्याच धारणेने वागली. आपली मूळ धारणा तिने कधी बदलली नाही. नंतरचे माझे आयुष्य तर वादळी झाले. सारखे चढउतार. तुरुंग पिच्छा सोडेना. पण तो कठीण काळ तिने मोठय़ा धीराने, समजुतीने एकटी राहून स्वीकारला. आत्मभान, समाजभान आणि कर्तव्यभान असा तिचा विकास मी पती म्हणून अनुभवला आहे. तिला चळवळीतून जे आत्मभान प्राप्त झाले त्यातूनच अनेक संकटांचा मुकाबला शांतपणे करण्याची क्षमता तिच्यामध्ये आली. कोणत्याही कार्यकर्त्यांला त्याची जीवनसाथी सर्वार्थाने सहकार्य करत असेल तर संसारात सुसंवाद राहातो. नव्हे; आनंदनिर्मिती होते. दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडतो. त्याचे सामाजिक कार्य फुलते. फळाला येते. ऊर्मिला मुळात हुशार होतीच, तथापि कुशाग्र बुद्धीच्या कितीतरी तरुणींचे जीवन अखेरीस आत्मकेंद्रित झाल्याचे आढळते. पण सामाजिक भान आल्यामुळे स्त्रीच्या बुद्धीला नवे आयाम मिळतात. तसे ऊर्मिलाचे झाले.

चळवळीतून बदललेल्या, मला दिसलेल्या या काही स्त्रिया. त्यांचे जीवन त्यांच्या दृष्टीने यशस्वी झाले. त्याचे सामाजिक फलितही दिसले. कोणाचेही जीवन, पुरुष असो वा स्त्री, उपजत सामथ्र्यवान नसते. एकमेकांच्या साथीनेच माणसे स्वत:चे सामथ्र्य शोधतात! नव्या क्षमता संपादन करतात.

mgsnidhi@gmail.com

chaturang@expressindia.com