19 November 2017

News Flash

विचारांचं आणि माणुसकीचं नातं

मी महाराष्ट्रातील एका लहान खेडय़ातील शेतकरी कुटुंबातली मुलगी.

रझिया पटेल | Updated: September 9, 2017 12:57 AM

आंतरभारतीतर्फे देण्यात येणारा ‘सुसान बी अ‍ॅन्टोनी’ पुरस्कार प्रदान सोहळा

डॉ. रझिया पटेल या शिक्षण, स्त्री सुधारणा आणि सामाजिक प्रश्नांचे भान असणाऱ्या लेखिका व समाजसमीक्षक आहेत. यांची लेखनशैली प्रबोधनाविषयी आस्था प्रकट करणारी आहे. १९८२ मध्ये जळगाव शहरातील मुस्लीम पंचायतीने फतवा काढून मुसलमान स्त्रियांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची बंदी केली. याविरुद्ध रझिया पटेल यांनी अन्य मुस्लीम स्त्रियांना घेऊन वयाच्या अवघ्या २२ वर्षी मोठे आंदोलन करून मुस्लीम स्त्रियांवरील ही बंदी उठवलीच शिवाय या आंदोलनामुळे जळगावच्या त्या मुस्लीम पंचायत समितीवर सरकारने बंदीही घातली. रझिया यांनी छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या राष्ट्रीय संयोजक म्हणूनही काम पाहिले. त्यांनी अनेक संघटनांमध्ये कार्यरत असताना हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी प्रयत्न केले. त्यांना मानाच्या दोन फेलोशिपही मिळाल्या असून अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, नवरत्न पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. रझिया पटेल या पुणे शहरातील ‘सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज इन इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन’मध्ये अल्पसंख्याक सेलच्या प्रमुख आहेत.

मी महाराष्ट्रातील एका लहान खेडय़ातील शेतकरी कुटुंबातली मुलगी. भारतातली खेडी जशी असतात तसंच आमचं गावही होतं, आता त्यात बराच बदल झाला आहे. तरुण पोरं गाव सोडून चालली आहेत आणि बकाल उदासी गावात येते आहे. पण माझ्या लहानपणी गाव जिवंत होतं. गावात लोक धर्माने हिंदू-मुसलमान होते पण संस्कृतीने सर्वच जण शेतकरी होते. त्यामुळे एकमेकांमध्ये वेगळेपणा धार्मिक स्तरावर नव्हता. पण गावाची रचना गावगाडय़ाची होती. कोणी कुठे राहायचं हे ठरलेलं होतं. गावात जी काही पाच-पंचवीस घरं मुसलमानांची होती त्यात जातीनिहाय काही कुटुंबं होतीच. मग मुसलमान खाटीक, बांगडय़ा भरणारा कासार, गाद्या बनवणारा नदाफ, रमजानमध्ये सेहरीसाठी उठवणारं फकीर कुटुंब, पठाण, मोगल व सर्वच होते.

आमच्याकडे जशी ईद तशी दिवाळी, होळी, बैलपोळा, दसरा, मकरसंक्रांत, नागपंचमी साजरी व्हायची. मूíतपूजेचा तेवढा अपवाद बाकी सांस्कृतिक काही फरक नाही. ईद-ए-मिलाद, पैगंबर जयंतीच्या दिवशी पैगंबर गीत, या नबी सलाम अलैका इत्यादी, नमाज, कुराण पठण वगैरे व्हायचं. तसंच पंढरपूरची वारी आणि कीर्तनाचा गजर, हाजी मलंगच्या डोंगरावर हिंदू-मुसलमान सर्वच जायचे. सुगीच्या दिवसात रामलीला, महाभारत नाटक मंडळी यायची. शाळेतल्या मैत्रिणीसोबत भुलाबाई-भुलोजीचा भोंडला असं सगळं चालायचं.

शिवाय आमची शाळा ही जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची शाळा, संपूर्ण गावासाठी एकच शाळा, त्यामुळे सर्व जाती-धर्माचे आणि गरीब-श्रीमंत घरातले असे. सर्वच मित्र- मैत्रिणी मिळाले. एकमेकांचा आनंद आणि दु:ख आम्ही वाटून घेतलं. गावातल्या शेतकरी संस्कृतीने आमच्यावर एक संस्कार केला आणि जिल्हा परिषदेच्या शाळेने आमच्यावर दुसरा संस्कार केला तो सामाजिक. आता मला जेव्हा शहरात ‘तुम्ही मुसलमान असून मराठी भाषा चांगली कशी बोलता?’ असा प्रश्न विचारला जातो तेव्हा मी फक्त हसते. कारण मुसलमान आपल्यापासून कसा वेगळा या भावनेचा परिचय शहरात जास्त झाला. गावात सर्वच जण एकमेकांना पिढय़ान् पिढय़ा ओळखतात. त्यामुळे ते आणि आपण असा प्रश्न समोर आला नव्हता. शिवाय राहणीमान सारखंच, फक्त प्रार्थनेच्या पद्धती, विवाह पद्धती रमजानचे उपवास आणि काही रीतीरिवाज वेगळे इतकंच. वेशभूषाही जी शेतकऱ्यांची असते तीच मुस्लीम समाजातील पुरुषांची. आमच्या घरात किंवा गावातल्या कुठल्याच मुस्लीम कुटुंबात बुरख्याची पद्धत नव्हती. स्त्रियांनी डोक्यावर पदर घेऊन डोकं झाकलं पाहिजे हे मात्र होतं, पण ते हिंदू स्त्रियांसाठीही होतं. एकूणच सगळा समाज गावकरी होता आणि गावातल्या शेतकरी संस्कृतीचा प्रभाव माझ्या जडणघडणीवर पडला. त्यातून स्वकेंद्री विचार न करण्याचा संस्कारही झाला. कारण शेतकरी कधी तसा विचार करत नसल्याचंच मी पाहिलं.

मी शाळेत गेल्यानंतर जेव्हा लिहावाचायला शिकले तेव्हा पाठय़पुस्तकांव्यतिरिक्त वर्तमानपत्र वाचायला शिकले. गावांतील काही मोजक्याच घरांमध्ये वर्तमानपत्र यायचं त्यातील एक घर आमचं होतं. माझे वडील सामाजिक जाणिवा असलेले होते. त्यामुळे वर्तमानपत्रं घरी मागवलं जायचं. आमच्या संयुक्त कुटुंबात माझी आई ही अक्षरओळख असलेली आणि वर्तमानपत्र वाचू शकणारी, अशी एकमेव स्त्री होती. घरात आलेलं वर्तमानपत्र वडील तर वाचायचेच पण माझी आई आणि आम्ही मुलंही वाचायचो. पुढे पुढे आमचे धाकटे काका हमीद पटेल आम्हाला गोष्टींची पुस्तकं आणून द्यायचे. त्यात मराठीसोबतच हिंदी भाषेतली पुस्तकं पण असायची. जेव्हा धार्मिक शिक्षण घ्यायची वेळ आली तेव्हा धार्मिक शिक्षण आणि शाळेतील शिक्षण यात आमचं कुटुंब काय गावातील मुस्लीम समाजाने कधी गल्लत केली नाही. शाळेच्या वेळा सोडून धार्मिक शिक्षण दिलं जायचं. धार्मिक शिक्षण म्हणजे काय तर कुराण पठण. ते अरबीमध्ये असायचं. पण आम्ही नमाज वगैरेच्या पद्धती घरातली मोठी माणसं आणि त्यासाठी देवनागरी हिंदी लिपीतून मिळणारी माहिती पुस्तकं यातून शिकत गेलो. आम्हाला ज्यांनी कुराण वाचायला शिकवलं ते अब्दुल रहीम देशमुख रूढार्थाने मौलाना नव्हते, पण धार्मिक विद्वान होते. त्यांनी आम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, ‘‘मजहब नही सीखाता आपस मे बैर रखना.’’ शिवाय त्यांनी सांगितलं, ‘‘कुराणाचे पठण अर्थ समजून घेऊन करा.’’ मग देवनागरी हिंदीत आयतींचा अर्थ सांगणारे कुराण शरीफ आम्ही वाचायला लागलो.

पुढे माझ्या वडिलांनी ‘साधना’ साप्ताहिकाची वर्गणी माझ्या नावाने भरली; तेव्हा मी पाचवीत होते. साधारण साप्ताहिक पोस्टाने माझ्या नावाने यायला लागले. ते मी वाचायला सुरुवात केली. माझ्या वडिलांवर गांधीजी, साने गुरुजी आणि स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव होता. त्यांचं नाव अब्दुल रहीम पटेल. त्यांचा लोकसंग्रह अफाट होता आणि सर्वानाच त्यांच्याबद्दल प्रेमादर होता. त्यांचा विश्वास सत्तातीत, धर्मातीत राजकारण आणि लोकनीती यावर होता. माझ्या वडिलांच्या या व्यक्तिमत्त्वाचाही खोल ठसा माझ्या मनावर उमटला आहे. त्यांनी मला प्रश्न विचारणं शिकवलं आणि माणुसकीची तत्त्वं शिकवली. त्यांचा लोकशाही मूल्यांवर विश्वास होता. त्यामुळे त्यांनी १९७५ ते ७७ मध्ये देशावर लादण्यात आलेल्या आणीबाणीला त्यांनी विरोध केला. तर अशा तऱ्हेने ‘साधना’ साप्ताहिकातून मला राष्ट्र सेवादल, समतेसाठी सुरू असलेले विविध लढे, मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नांवर चाललेले लढे इत्यादीबाबत माहिती होत होती. याच काळात मी कुटुंबाकडे डोळसपणे पाहायला शिकले. एकीकडे घरातलं स्त्रियांचं स्थान, त्यांना नसणारं निर्णय स्वातंत्र्य हे तर दिसत होतंच. पण शाळेत बहिणाबाईंच्या कवितांनीही एक भान दिलं. ‘‘बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोटय़ा, नही नशीब नशीब तय हाताच्या रेघोटय़ा, नको नको रे जोतिष्या नको हात माह्या पाहू, माह्य़ं दैव माले कये माह्या दारी नको येवू.’’ अशा कवितांचा खूप प्रभाव पडला.

राम गणेश गडकरींच्या ‘एकच प्याला’तील एक उतारा पाठय़पुस्तकात घेण्यात आला होता. त्यातील ‘देव मेला कुठे दडी मारून बसला आहे कुणास ठाऊक’ असं म्हणणारी, स्त्रियांवरील अन्यायाची चीड असणारी गीता ही मनात घर करून बसली या सर्व पाश्र्वभूमीवर अवतीभवतीच्या घरांमधील परित्यक्ता, विधवांची दु:खद स्थिती मला जाणवायला लागली. ती त्यांच्या आपापसातील दु:खद अभिव्यक्तीतून. पुढे तलाकचं एक निष्ठुर प्रकरण मी पाहिलं. या गोष्टींचा माझ्या मनावर परिणाम झाला. असं का व्हावं! हा प्रश्न वारंवार मनात निर्माण व्हायला लागला.

त्यातून बंडखोरी निर्माण झाली. देशातल्या आणीबाणीच्या पाश्र्वभूमीवर स्नेहलता रेड्डी यांच्या ‘सीता’ नावाच्या नाटकाचा सरिता पदकी यांनी केलेला अनुवाद ‘साप्ताहिक साधना’मध्ये प्रकाशित झाला होता. त्यातली सीता माझ्याच भावना बोलते आहे, असं मला वाटलं. देशातल्याच नाहीतर माझ्या अवतीभवतीही स्त्री म्हणून जी आणीबाणी समाज व्यवस्थेने उभी केली होती त्या विरुद्ध लढण्याची, बंडाची, विद्रोहाची भाषाही सीता बोलत होती. ती म्हणत होती, ‘‘अशा परिस्थितीत मी काय करावं? मला उत्तराची अपेक्षा नाहीच. बंडखोरी करून मरण पत्करणं किंवा शरण जाणं हे दोनच रस्ते माझ्यापुढे आहेत. मला मरणाची भीती वाटत नाही; पण हा समाज, त्याची ही नीती, धर्म या नावाखाली जे ढोंग भविष्यकाळापर्यंत चालवलं जाईल त्याला घाबरते मी. पुरुष जातीच्या भयंकर दडपणाची भीती वाटते मला. आम्ही स्त्रिया भुवया न उंचावता मान तुकवतो, पुरुषांचं अधिराज्य स्वीकारतो, आतल्या आत दु:ख सोसतो काही न बोलता, पण मी शरण जाणार नाही, मी स्वतंत्रपणे निवड करीन माझी निवड आहे बंडाची, जीवनाचं मोल द्यावं लागलं तरी मला माहीत आहे जग एका दिवसात बदलणार नाही.’’

या काळात माझा कुटुंबात, समाजात संघर्ष सुरू झाला. माझ्या मनात निर्माण होणारे प्रश्न घरातल्या लोकांशी बोलताना संघर्ष निर्माण होऊ लागला. वडिलांना माझी घुसमट कळत असली तरी ते एकटे होते. या काळात मी ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक यदुनाथजी थत्ते यांना पत्रे लिहिली. त्यांचा त्या काळात मोठा मानसिक आधार मिळाला. पुढे यदुनाथजी माझ्या वडिलांना भेटले आणि नंतर घर सोडल्यावर मी यदुनाथजींकडे राहिले. आता मागे वळून बघताना मला असं दिसतं की माझे वडील आणि यदुनाथजी यांचा परस्परांवर केवढा विश्वास. त्यात धर्म आडवा आला नाही. मी यदुनाथजींकडे मुलीप्रमाणे राहिले. आज आपण अशा स्थितीची कल्पना करू शकू का? दोन समाज एकमेकांपासून किती दूर होत आहेत. पण हे विचारांचं आणि माणुसकीचं नातं होतं.

आमची शाळा जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची शाळा, संपूर्ण गावासाठी एकच शाळा, त्यामुळे सर्व जाती-धर्माचे आणि गरीब-श्रीमंत घरातले असे. एकमेकांचा आनंद आणि दु:ख आम्ही वाटून घेतलं. गावातल्या शेतकरी संस्कृतीने आमच्यावर एक संस्कार केला आणि जिल्हा परिषदेच्या शाळेने दुसरा संस्कार केला तो सामाजिक. आम्हाला ज्यांनी कुराण वाचायला शिकवलं ते अब्दुल रहीम देशमुख यांनी आम्हाला सांगितलं होतं, ‘‘मजहब नही सीखाता आपस मे बैर रखना.’’

रझिया पटेल

raziap@gmail.com

First Published on September 9, 2017 12:57 am

Web Title: dr razia patel women empowerment right to education