डॉ. कुमार सप्तर्षी

स्त्री व पुरुषांच्या समान सहभागानेच परिवर्तनाच्या चळवळी चालल्या पाहिजेत हा आमचा आग्रह होता. स्त्री व पुरुष या दोघांतही आधुनिक मूल्ये रुजली पाहिजेत. दोघांनी हातात हात घालून चळवळी वा संसार केला, तरच स्त्री-मुक्ती व पुरुष-मुक्ती एकाच वेळी यशस्वी होते. यालाच मानव-मुक्तीची चळवळ म्हणता येईल. निर्णयप्रक्रियेत स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांना परस्परांविषयी आदर असला तर एकांगी प्रवृत्तीपासून त्यांचा बचाव होतो.

देशात आणीबाणी लागली. आम्ही भूमिगत झालो. सर्व भूमिगत कार्यकत्रे गुजरातमध्ये एकत्र जमत. तिथे देशभरातील आणीबाणी विरोधी लढय़ाची माहिती मिळे. गुजरातमध्ये गांधीवादी नेते बाबुभाई जशभाई पटेल मुख्यमंत्री होते. सरकार होते जनमोर्चाचे! काँग्रेस वगळून सर्व पक्षांची राजकीय आघाडी म्हणजे जनमोर्चा. माझ्यावर पकड वॉरंट होते. फक्त तिथेच आम्हाला स्वातंत्र्य होते. मी व माझे साथी डॉ. अरुण लिमये आम्ही दोघे जण गुजरातकडे निघालो. महाराष्ट्र व गुजरातची सरहद्द कशी ओलांडणार हा गहन प्रश्न होता. तिथे महाराष्ट्राच्या पोलिसांकडून कस्सून तपासणी व्हायची. एकदा गुजरातमध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र काहीच प्रश्न निर्माण होणार नव्हता. सरहद्द ओलांडून जायचे कसे, एवढाच प्रश्न होता.

आम्ही एक शक्कल लढवण्याचे ठरवले. ‘युक्रांदीय’ मुली धीट बनलेल्या असत. पारंपरिक पुरुषप्रधान संस्कृतीच्या कौटुंबिक वातावरणातून त्या बाहेर पडलेल्या असायच्या. त्यांचे जीवनसाथीदेखील समविचारी असत. ते पुरुषप्रधान संस्कृतीमधून मुक्त होण्यात अभिमान बाळगत. आम्ही विचार केला की ‘लग्नाला जाणारे कुटुंब’ असे नाटक करून सरहद्द ओलांडायची. गाडीत कुटुंब दिसले की पोलीस जास्त चौकशी करणार नाहीत असा अंदाज होता. ठाण्यामध्ये एका समविचारी नवविवाहित जोडप्याकडे रात्री मुक्कामाला राहिलो. सकाळी चहाच्या वेळी त्यांच्या पुढे एक प्रस्ताव मांडला. पत्नी मत्रीण आणि तिचा पतीही आमचा मित्र. आमचा प्रस्ताव असा होता की त्याच्या पत्नीने आमच्यासोबत प्रवास करायचा आणि गुजरातची सरहद्द ओलांडायची. हे नाटक काही तासांपुरतेच होते. आम्ही एका डॉक्टर मित्राच्या गाडीतून प्रवास करणार होतो. तोही ठाण्याचाच. सरहद्द ओलांडल्यानंतर त्याने परत मत्रिणीला घरी आणून सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्या पती-पत्नींनी शून्य मिनिटात आमचा प्रस्ताव मान्य केला. अवघड वाटणारी गोष्ट सोपी बनली. धो धो पावसात रात्री प्रवास करायचा होता. ठरल्याप्रमाणे आम्ही अहमदाबादच्या दिशेने प्रवास सुरू केला. नाटकातील बायको दुसऱ्या दिवशी सकाळी ठाण्याच्या घरी तिच्या पतीकडे सुखरूप पोहोचली. आणीबाणीत लोक आमच्यासारख्यांना भेटणे टाळायचे. नजरभेट झाली तर तोंड फिरवायचे. त्या काळात असे धाडस क्वचित होते.

आजसुद्धा असले विचित्र साहस करायला सामान्य मुलगी वा तिचा पती तयार होणार नाहीत. या मुलीने व तिच्या नवऱ्याने त्या काळात हे सहजपणे व आनंदाने कसे स्वीकारले? ‘युक्रांद’मध्ये स्त्री-पुरुष समानता व स्त्रीला वस्तू न मानता व्यक्ती मानणे हे प्रशिक्षण होते. या प्रशिक्षणातून मुलींच्या मनातील पूर्वसंस्काराची काळोखी झडून जात असे. त्या कठीण प्रसंगाला सामोरे जायला तयार होत. त्याचबरोबर आत्मभान आल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वागीण विकास होत असे. त्यामुळे अनावश्यक संकोच गळून पडे. स्त्रीला माणूस म्हणून होणाऱ्या प्रगतीमधला हा अकारण संकोच म्हणजे एक मोठा अडसर असतो. ‘युक्रांद’मुळे हा मानसिक अडथळा दूर होई.

दुसरा एक प्रसंग! कर्जत तालुक्यात परिवर्तन करण्यासाठी राशीन गावात ‘युक्रांद’ने एक कम्युन सुरू केले होते. एकत्र राहायचो. एकत्र भोजन करायचो. त्यात ८ पूर्णवेळ पुरुष कार्यकत्रे आणि ४ महाविद्यालयीन स्त्री कार्यकर्त्यां होत्या. भोवतालच्या खेडय़ात रोज पदयात्रा चाले. स्थानिक मालकशाहीचे गुंड हल्ला करण्याचा धोका असे. म्हणून आम्ही आधी ‘युक्रांद’मधल्या मुलींना राशीन कम्युनमध्ये सामील होण्याचा आग्रह केला नव्हता. पण त्यांनी हट्टच धरला. त्यांना सामील करून घेतले नाही तर मुली पुरुषांपेक्षा दुबळ्या असतात हा समज दृढ होईल असे त्यांचे म्हणणे!

खेडय़ातील परिस्थिती पाहता, पुरुषांना कोणत्याही घरातील स्त्रीशी थेट संवाद साधणे अशक्यप्राय होते. चारित्र्याचे वादंग निर्माण झाले असते. ‘युक्रांदीय’ मुली कोणत्याही घरात चुलीपर्यंत पोहोचत. घरातील पुरुषांना टाळून त्यांचा बायकांशी, मुलींशी जिव्हाळ्याचा संवाद घडत असे. त्यामुळे कम्युनच्या बठकीत आमच्याकडे विलक्षण वेगळी अशी माहिती गोळा होई. त्यांच्या भेटीत घरातील बायका-मुली प्रश्नांचा भडिमार करीत. ‘तुम्ही कुंकू का लावत नाही? पंजाबी ड्रेस का घालता? साडी का नेसत नाही?’ वगरे. एका कार्यकर्तीचा नुकताच विवाह झाला होता. तिचा नवरा ‘युक्रांदीय’. तिला स्त्रिया भंडावून सोडत की, ‘तू मंगळसूत्र का घालत नाहीस? तू मंगळसूत्र घातले नाही तर नवरा तुला मारत नाही का?’

मुलींच्या पुढाकाराने संघटनेत पूर्वीच एक ठराव संमत झाला होता. जोपर्यंत पत्नीनिष्ठा व्यक्त करण्यासाठी पुरुष कुंकवासम काहीतरी विवाह चिन्ह लावत नाहीत वा गळ्यात माळ वगरे सौभाग्यचिन्ह घालत नाहीत; तोपर्यंत कुंकू लावणे वा मंगळसूत्र घालणे हा पूर्णपणे मुलींच्या मर्जीचा प्रश्न राहील. फक्त स्त्रीने पतीनिष्ठेची प्रतीके परिधान करणे ही एकेरी निष्ठा आहे. एकेरी वाहतुकीप्रमाणे! हा ठराव पुरुष व स्त्रिया यांनी एकमताने संमत केला होता. विशेष म्हणजे स्त्री-मुक्ती चळवळ भरात येण्यापूर्वीचा ‘युक्रांद’चा हा ठराव आहे.

राशीन कम्युन ऐन भरात असताना अचानक आघात झाला. देशात आणीबाणी जाहीर झाली. राशीनला आणीबाणीच्या निषेधार्थ मोर्चा निघाला. सामुदायिकरीत्या इंदिरा गांधींचे फोटो जाळण्यात आले. ही बातमी जिल्ह्य़ाच्या ठिकाणी पोहोचताच पोलिसांच्या राखीव दलाची तुकडी घेऊन डी.वाय.एस.पी. राशीनमध्ये अवतरले. जोरदार अटकसत्र सुरू झाले. गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मी बाहेर होतो. फोनाफोनी करून पुण्याहून ‘युक्रांद’च्या नेत्यांनी आदेश दिला की प्राप्त परिस्थितीत प्रथम कम्युनमधील मुलींना मुंबईस सुखरूप पाठवून द्यावे. बाकी कार्यकर्त्यांनी भूमिगत व्हावे. या आदेशाविरुद्ध मुलींनी बंडाचा झेंडा उभारला. त्या म्हणाल्या, ‘‘पुरुष व स्त्री कार्यकर्त्यांसाठी ‘युक्रांद’मध्ये समान वागणूक हवी. आमच्यासाठी वेगळा आदेश का?’’ ‘युक्रांद’मधल्या मुलींनी अनेक प्रसंगांतून हे दाखवून दिले की आमची काळजी घेण्याच्या नावाखालीदेखील आम्हाला दुबळे मानण्याची चूक पुरुषांनी करू नये. हा आत्मविश्वास स्त्री आत्मनिर्भर झाल्यानंतरच जागा होतो. ‘युक्रांद’ने हा आत्मविश्वास आपल्या स्त्री-कार्यकर्त्यांना दिला हे नक्की.

आणखी एक प्रसंग आहे नाशिक जिल्ह्य़ातील मालेगावचा. ‘युक्रांद’च्या नेतृत्वाखाली मालेगावचे स्थानिक बलदंड नेते व्यंकटराव हिरे यांच्या बी.एड. महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी उग्र आंदोलन केले. मध्यरात्री मालेगावात माझी सभा झाली. व्यासपीठावरून खाली उतरताच मला अटक झाली. माझ्यामागे उषा मंजिरे या ‘युक्रांदीय’ कार्यकर्तीने त्या आंदोलनाचे नेतृत्व समर्थपणे सांभाळले. आंदोलन यशस्वी झाले. त्या आंदोलनात पुरुष विद्यार्थी बहुसंख्येने होते. तरी उषाचे नेतृत्व बहुसंख्येने मान्य करण्यात आले. राजकीय पक्षांमध्ये वा संघटनांमध्ये स्त्री आघाडय़ा असत. याउलट ‘युक्रांद’मध्ये वेगळी स्त्री आघाडी नव्हती. स्त्री वा पुरुष असा कार्यकर्त्यांमध्ये भेद केला जात नसे. याला कारण होते. ‘युक्रांद’च्या स्थापनेमध्ये मुलींचा बरोबरीने सहभाग होता. १९६७ मध्ये सिंहगडावर लोकमान्यांच्या बंगल्यात ‘युक्रांद’ची स्थापना झाली. त्या शिबिरात ८० महाविद्यालयीन तरुण व ६० विद्याíथनी होत्या. स्त्रियांची ही संख्या नगण्य नव्हती. समान सहभागामुळे आपोआपच कार्यकर्त्यां मुली पुरुषांच्या बरोबरीने विकसित होत होत्या.

आत्मभान आलेल्या मुलींना डोळ्यांसमोर जातीय व धार्मिक अस्मिता शिल्लक उरत नाहीत. संविधानाने स्त्री-पुरुषांना बरोबरीचा दर्जा दिलाय. समाजाला त्याचे भान अजूनही आलेले नाही. समाज संविधानातील मूल्ये स्वीकारायला अजूनही तयार झालेला नाही. पुरोगामी चळवळीतून काही व्यक्तींना समानतेचे भान प्राप्त होते. पण तसे झाले तर त्यांची नाळ कुटुंब व नातेवाईक यांच्यापासून तुटते. म्हणून पुरोगामी बनलेल्या व्यक्तींना स्वत:चा जीवनसाथी निवडण्याशिवाय पर्याय नसतो. तडजोड करून, पारंपरिक पद्धतीने त्यांनी विवाह केला तर कौटुंबिक संघर्ष टळतो; पण ती व्यक्ती आयुष्यभर पराभूत मनोवृत्तीने वागते. याउलट स्वत:च स्वत:चा जीवनसाथी निवडला तर तो कोणत्याही जातिधर्माचा असू शकतो. समविचारी जीवनसाथी असल्याशिवाय जगणे मुश्कील होते ही जाण आमच्यात स्पष्टपणे जाणवत होती. संघटनेच्या अंतर्गत मोठय़ा प्रमाणावर आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह झाले. विशेष म्हणजे आज ५० वर्षांचा काळ लोटला तरी आंतरजातीय विवाहामुळे कुणाचे नुकसान झाले असा अनुभव नाही. एकमेकांना समजून घेण्याचे सामथ्र्य स्त्री-पुरुषांनी एकत्र उभारलेल्या चळवळींमधूनच प्राप्त होते असा निष्कर्ष काढता येतो.

त्या काळात मागची पिढी आम्हाला भीती घालत असे. प्रेमाच्या स्वार्थापोटी तुम्ही आंतरजातीय विवाह कराल; पण तुमच्या मुलाबाळांना समाज स्वीकारणार नाही. त्यांचे विवाह होणार नाहीत. तुमचा वंश खुंटेल. ही भीती पूर्णपणे निराधार ठरली. आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहातून जन्मलेली अपत्ये अधिक चतन्यशील आहेत. करिअरमध्ये यशस्वी आहेत. या मुलांचे विवाह अतिशय समाधानकारकरीत्या पार पडले. कसलाही अडथळा आला नाही. ते आपल्या मुलाबाळांसह आनंदात संसार करीत आहेत. ते स्वत:स भारतीय मानतात.

त्या काळात स्वतंत्र स्त्री-मुक्ती संघटना स्थापन झालेल्या नव्हत्या. स्त्री व पुरुषांच्या समान सहभागानेच परिवर्तनाच्या चळवळी चालल्या पाहिजेत हा आमचा आग्रह होता. स्त्री व पुरुष या दोघांतही आधुनिक मूल्ये रुजली पाहिजेत. दोघांनी हातात हात घालून चळवळी वा संसार केला, तरच स्त्री-मुक्ती व पुरुष-मुक्ती एकाच वेळी यशस्वी होते. यालाच ‘मानव-मुक्ती’ची चळवळ म्हणता येईल. निर्णयप्रक्रियेत स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांना परस्परांविषयी आदर असला तर एकांगी प्रवृत्तीपासून त्यांचा बचाव होतो. संविधानातील स्त्री-पुरुष समानता हे मूल्य समाजात रोपण करायचे आहे. त्यासाठी पुरुषही बदलले पाहिजेत. भारतातील जातिसंस्थेचे स्त्री-दास्य हे व्यवच्छेदक लक्षण आहे. जातिसंस्थेला नकार दिल्याशिवाय स्त्री तिच्या दास्यातून मुक्त होणार नाही, तिचे व्यक्तिमत्त्वही विकसित होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. केवळ जातिनिर्मूलनाची चळवळ किंवा केवळ स्त्री-मुक्ती चळवळ या अपूर्ण आहेत. त्या सजगपणे केल्या तर मात्र त्या परस्परावलंबी आहेत. एकमेकांना पूरक आहेत.

mgsnidhi@gmail.com  

chaturang@expressindia.com