13 July 2020

News Flash

का रे भुललासी?

संगणकीय सॉफ्टवेअर्स हा आजच्या जगण्याचा एक परवलीचा शब्द.. त्यावर प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते. पण या सॉफ्टवेअर्सना पेटंट द्यायची की नाही हा वर्षानुवर्षांपासून गोंधळाचा विषय

चार्ल्स अ‍ॅलन गिल्बर्ट (जन्म ३ सप्टेंबर १८७३- मृत्यू १० एप्रिल १९२९) या अमेरिकी बोधचित्रकाराने वयाच्या १९ व्या वर्षी साकारलेले ‘ऑल इज व्हॅनिटी’ हे चित्र. (कॉपीराइटमुक्त, ‘विकिमीडिया’ वरून)

संगणकीय सॉफ्टवेअर्स हा आजच्या जगण्याचा एक परवलीचा शब्द.. त्यावर प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते. पण या सॉफ्टवेअर्सना पेटंट द्यायची की नाही हा वर्षानुवर्षांपासून गोंधळाचा विषय आहे. सॉफ्टवेअर्स ना गणिती प्रमेये म्हणायचे की एका यंत्राचा भाग? ‘नुसत्या सॉफ्टवेअर्स’ना पेटंट नाकारायची.. आणि मग एखाद्या प्रक्रियेचा भाग असलेल्या सॉफ्टवेअर ला पेटंट्स द्यायची का? आणि ‘औद्योगिक पद्धती’ना पेटंट्स द्यायची की नाही? आणि मग ही औद्योगिक पद्धत एखाद्या सॉफ्टवेअरचा वापर करत असेल तर मग आणखीच गोंधळ.. एकूणच हा मामला दृष्टिभ्रम निर्माण करणाऱ्या या गमतीशीर चित्रांसारखा आहे.. पण इथे या भ्रमामुळे करमणूक होत नाही, तर प्रचंड गोंधळ निर्माण होतो!

अलीकडे सोशल मीडियावर दृष्टिभ्रम करणारी अनेक चित्रे आपल्या सगळ्यांच्याच पाहण्यात येतात. म्हणजे एकाच चित्रात एका पद्धतीने पाहिले तर एक तरुण मुलगी असते आणि दुसऱ्या बाजूने पाहिले तर एक म्हातारी चेटकीण.. किंवा एक कवटी आणि एक साजशृंगार करणारी स्त्री वगरे. ही चित्रे भ्रम निर्माण करतात.. बघणाऱ्याला अगदी भुलवतात. वेळ घालवण्यासाठी छान असतात ही भ्रमचित्रे.. आणि करमणुकीसाठीसुद्धा. पण एखाद्या महासत्ता असलेल्या देशाचा व्यापारउदिमावर किंवा संशोधनावर दूरगामी परिणाम करणारा पेटंटबाबतीतला महत्त्वाचा कायदा जर असा भ्रम निर्माण करू लागला तर? वर्षांनुवर्षे न्यायालयांना आणि न्यायाधीशांना असा भुलवू लागला तर? ..तर खरे तर तो दुरुस्त केला जायला हवा.. पण तो जेव्हा दुरुस्त केला जात नाही तेव्हा तो मुद्दाम तसा ठेवला जातो आहे की काय, अशी शंका येऊ लागते. म्हणजे आपल्या सोयीने त्याच्याकडे हवे तसे पाहता येते आणि हवा तसा त्याचा अर्थही लावता येतो.
सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटरसंबंधित बिझनेस मेथड्सना पेटंट द्यायची की नाही याबद्दल अमेरिकन न्यायालये अशी वर्षांनुवर्षे संभ्रमित झालेली दिसतात. खरे तर जगातल्या बहुतेक सगळ्या देशांत पेटंटयोग्य न समजली जाणारी संशोधने म्हणजे सजीव, सॉफ्टवेअर्स आणि औद्योगिक पद्धतीबद्दलची पेटंट्स. त्यापैकी सजीवांच्या पेटंट्सबद्दल अमेरिकन कायदा कसा उत्क्रांत झाला हे आपण पाहिले. सॉफ्टवेअर्स आणि बिझनेस मेथड्सच्या बाबतीत मात्र अमेरिकन न्यायालयात प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे आणि आíथक महासत्ता असलेल्या या देशातच हा गोंधळ असला की आपसूकच तो जगातल्या इतर देशांतही परावर्तित होणे साहजिक आहे.
ज्या चार प्रकारच्या संशोधनांवर अमेरिका पेटंट देऊ करते ती म्हणजे प्रक्रिया, यंत्रे, उत्पादन आणि ‘कम्पोझिशन ऑफ मॅटर’. यात कुठेही स्पष्टपणे कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा उल्लेख नाही, पण त्याप्रमाणेच जीन्स किंवा डीएनएचा किंवा जैवतंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या जिवाणूचाही उल्लेख नाही. पण अशा जिवाणू आणि डीएनएवर पेटंट्स दिली गेली आहेत हेही आपण पाहिले. कायद्यात अशी धूसरता असल्यामुळे न्यायालयांनी त्याचा अर्थ लावण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आणि चक्रवर्ती खटल्यात असा अर्थ लावताना म्हटले की,everything under the sun made by man is petantable in America. पण माणसाने शोधून काढलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे त्याचे संशोधन नसते आणि म्हणून न्यायालयांनी हे वारंवार सांगितले आहे की, निसर्गाचे नियम, नसíगक घडामोडी किंवा अमूर्त मूलतत्त्वे किंवा कल्पनांवर (उदा. आइनस्टाइनचे तत्त्व किंवा न्यूटनचे गुरुत्वाकर्षणाचे नियम) पेटंट्स दिली जाणार नाहीत. अमूर्त गणित किंवा गणिती कल्पनाही म्हणूनच पेटंट देण्यास अयोग्य समजल्या जातात.. गणित म्हणजेही शेवटी एक अमूर्त कल्पना आहे, हे कारण येथे लागू पडते.
आता ही पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर सॉफ्टवेअर्सवर पेटंट द्यावे की नाही यातील गोंधळ लक्षात येऊ शकेल. संगणकाचे सॉफ्टवेअर हे एक गणिती सूत्र समजायचे की ते कॉम्प्युटर या उपकरणाचा एक भाग समजायचे? कारण त्याला जर गणितातील सूत्र समजायचे झाले तर ती एक अमूर्त कल्पना आहे.. मग त्यावर पेटंट देता येणार नाही. पण त्याला जर कॉम्प्युटर या विजेवर चालणाऱ्या उपकरणाचा एक भाग समजायचे झाले तर मात्र त्यावर पेटंट देता येईल.
महत्त्वाचे दोन खटले
१९७२ साली गॉट्सचॉक विरुद्ध बेन्सन या खटल्यात हा प्रश्न न्यायालयासमोर आला. यात बायनरी कोडेड डेसिमल नंबरचे रूपांतर खऱ्या अपूर्णाकांत करणाऱ्या एका गणिती प्रमेय असलेल्या सॉफ्टवेअरवर पेटंट नाकारण्यात आले. त्यानंतर १९७८ मध्ये पार्कर विरुद्ध फ्लूक खटल्यातही तेच झाले. एक रासायनिक प्रक्रिया चालू असताना त्या प्रक्रियेत तापमान एका विशिष्ट प्रमाणाच्या वर वाढले की एक गजर वाजत असे आणि या तापमानाच्या आकडय़ांनी एक विशिष्ट मर्यादा ओलांडली की गजर वाजण्यासाठी त्यात एक गणिती प्रमेय वापरण्यात आलेले होते. हे पेटंटसुद्धा नाकारण्यात आले.
मग १९८१ मध्ये कोर्टासमोर आला डायमंड विरुद्ध डायर हा खटला. पेटंट होते नसíगक रबरपासून एक सेमिसिंथेटिक रबर बनविण्याची प्रक्रिया. इथे रबर गरम करण्यासाठी लागणारा वेळ एक कॉम्प्युटर सॉफ्टवेअर नियंत्रित करत होते. पण हे पेटंट काही फक्त या सॉफ्टवेअरवर नव्हते. तर रबर मोल्ड करण्याच्या प्रक्रियेवर होते. या वेळी मात्र हे पेटंट देण्यात आले. हे पेटंट देताना न्यायालय असे म्हणाले की, हे पेटंट फक्त सॉफ्टवेअरवर नव्हे तर रबर मोिल्डगच्या प्रक्रियेवर घेण्यात आले आहे आणि हे सॉफ्टवेअर या प्रक्रियेचा केवळ एक भाग आहे.

व्यवसाय-प्रक्रियांचा प्रश्न
झाले.. डायमंड विरुद्ध डायर खटल्याने आणखी एक नवा पायंडा पाडला. यानंतर अनेक संशोधकांनी सॉफ्टवेअर्सवर पेटंट्स फाइल केली. ‘नुसत्या सॉफ्टवेअरवर पेटंट न मागता ते एखाद्या प्रक्रियेचा भाग दाखविले किंवा एखाद्या उपकरणाचा भाग दाखवले तर त्यावर पेटंट मिळते,’ असा समज रूढ झाला आणि हा समज नव्वदचे संपूर्ण दशकभर कायम राहिला. याबरोबरच दुसरा एक वादाचा विषय होता औद्योगिक पद्धतीवरील पेटंट्सचा. औद्योगिक पद्धत म्हणजे काय? तर कुठल्याही उद्योगाला मदत करणारी प्रक्रिया.. विमा किंवा आरोग्य, ई-शॉिपग, बँकिंग, बििलग या क्षेत्रांतील उद्योगासाठी वापरण्यात येणारी कुठलीही पद्धत.. मग ती पद्धत माणसांनी वापरण्याची असू शकेल (उदाहरणार्थ, अ‍ॅमवे किंवा टप्परवेअर वापरतात ती विक्रीची विशिष्ट पद्धत- ‘मल्टिलेव्हल मार्केटिंग’) किंवा मग ती सॉफ्टवेअरचा वापर करणारी पद्धत असेल. या पद्धतीही आधी सांगितलेल्या प्रक्रिया, यंत्र, उत्पादन किंवा ‘कॉम्पोझिशन ऑफ मॅटर’ या यादीत बसत नसल्याने पेटंटयोग्य समजल्या जात नसत. १९९७ मध्ये स्टेट स्ट्रीट बँक खटल्यात मात्र सॉफ्टवेअरचा वापर करून मोठय़ा माहितीवर प्रक्रिया करणाऱ्या एका बिझनेस मेथडवर न्यायालयाने पेटंट दिले. त्यानंतर अनेक सॉफ्टवेअर आणि बिझनेस मेथड्सना पेटंट्स देण्यात आली. पण २०१० मधल्या बिलस्की खटल्यात मात्र परत सॉफ्टवेअरचा वापर करणाऱ्या एका बिझनेस मेथडवर पेटंट नाकारण्यात आले.
अमेरिकन न्यायालयांनी दिलेले अशा खटल्यांमधील उलटसुलट निर्णय बाकीच्या देशांतील अशा पेटंट्सवरही परिणाम करतातच. भारताच्या पेटंट कायद्यात मात्र ‘नुसत्या सॉफ्टवेअर’वर पेटंट देण्यात येऊ नयेत, असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे अमेरिकेपेक्षा इथे निर्णय देणे अर्थातच सोपे आहे.. पण ‘नुसती’ किंवा ‘केवळ’ सॉफ्टवेअर म्हणजे काय.. आणि हार्डवेअरचा किंवा इतर काही यंत्रांचा भाग असलेल्या सॉफ्टवेअर्सवर पेटंट द्यायचे की नाही, हा परत वादाचा मुद्दा आहेच.
मुळात सॉफ्टवेअर्स हा एका कल्पनेची अभिव्यक्ती आहे.. एवढेच की, ही अभिव्यक्ती कॉम्प्युटरच्या बायनरी कोडमध्ये लिहिली जाते. कॉपीराइटच्या व्याख्यांत हे सर्व बसत असल्यामुळे ‘नुसत्या’ सॉफ्टवेअर्सना कॉपीराइटचे संरक्षण असतेच. पण कॉपीराइट हा तुलनेने दुबळा हक्कआहे. पेटंटइतके कॉपीराइटचे संरक्षण परिणामकारक समजले जात नाही आणि म्हणून सॉफ्टवेअर्स बनवणाऱ्या संशोधकांचा हट्ट त्यांना पेटंट मिळावे असा असतो आणि त्यांनी पेटंटसाठी अर्ज केला की, न्यायालये आणि पेटंट कार्यालये वर सांगितलेल्या गोंधळात अडकतात. या पेटंटकडे गणिती प्रमेय म्हणून पाहायचे की उपकरणाचा भाग म्हणून हे त्यांना कळेनासे होते आणि मग त्यांना कधी ती पेटंट्स देण्यायोग्य वाटतात तर कधी वाटत नाहीत.. न्यायालये या प्रश्नाने भ्रमू लागतात, भुलू लागतात.. अगदी या चित्रातल्याप्रमाणे.. पण इथे मात्र या भ्रमाने करमणूक होत नाही.. तर प्रचंड गोंधळ निर्माण होतो.

 

लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत. 

ईमेल : mrudulabele@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2015 2:18 am

Web Title: patent issue of software and industrial procedure
Next Stories
1 ..गोफ विणू!
2 उत्क्रांतीच.. सजीवांवरील पेटंटची!
3 ही शर्यत रे अपुली..!
Just Now!
X