वेळेचे निकष न पाळता दोन सत्रांमध्ये चालणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना त्यांचे दुसऱ्या सत्रातील अभ्यासक्रम बंद करण्याची सूचना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिली असून साधारण ३० संस्थांमधील पाळीतील अभ्यासक्रम बंद होणार आहेत.
अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माण अशा तंत्रशिक्षण अभ्यासक्रम संस्थांमध्ये दोन सत्रांत अभ्यासक्रम चालवण्यात येतात. मात्र पायाभूत सुविधांच्या निकषांतून पळवाट मिळावी म्हणून संस्था सकाळी आणि सायंकाळी असा दोन सत्रांत अभ्यासक्रम सुरू असल्याचे दाखवण्यात येत होते. एका सत्रात पदवी आणि दुसऱ्या सत्रांत पदविका अभ्यासक्रम चालवण्यात येत होता. प्रत्यक्षात मात्र हा अभ्यासक्रम एकाच सत्रांत चालवला जायचा. दोन्ही सत्रांसाठी असलेले शिक्षकही तेच असायचे. मात्र वेळेचे निकष न पाळणाऱ्या संस्थांचे दुसऱ्या पाळीतील अभ्यासक्रम बंद करण्याची सूचना एआयसीटीईने दिली आहे.
सात महाविद्यालयांना प्रवेश बंदी
मुंबईतील सात अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील त्रुटींबाबत सिटिझन फोरम या संस्थेकडून एआयसीटीईकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रार करण्यात आलेल्या महाविद्यालयांपैकी सात महाविद्यालयांना पुढील शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. याच संस्थेने तक्रार केलेल्या ४ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता कमी करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 4, 2016 1:51 am