विद्यापीठातील ६२७ पैकी ५९० कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे लावण्यात आली असून परीक्षेच्या दिवशीच कर्मचारी आणि शिक्षकांचे प्रशिक्षण असल्यामुळे पुणे विद्यापीठाचे परीक्षेचे वेळापत्रक पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.
मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक बदलले. त्यानंतर मतदानाच्या आधीच्या आणि पुढच्या दिवशी परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात यावे, अशी मागणी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे विद्यापीठाने पुन्हा एकदा वेळापत्रकामध्ये बदल केला. सध्या १६, १७, १८ एप्रिल आणि २३, २४, २५ एप्रिल या दिवशी होणाऱ्या परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलल्या आहेत. मात्र, आता बहुतेक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना येत्या आठवडय़ामध्ये निवडणुकीचे प्रशिक्षण लावण्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठवडय़ात होणाऱ्या विज्ञान व वाणिज्य शाखेच्या परीक्षांमध्येही बदल होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आह़े