विद्यार्थ्यांकडून फारशी मागणी नसलेले माहिती-तंत्रज्ञान, बायो-मेडिकल आदी अभ्यासक्रम बंद करण्याची परवानगी विविध महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाकडे मागितली आहे. परंतु, संबंधित संस्थेचे शिक्षकांशी वेतन व इतर कारणावरून न्यायालयीन वाद सुरू असल्याने विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने गुरुवारी तुकडय़ा बंद करण्याचे प्रस्ताव पुनर्विचारासाठी परत पाठविले आहेत.
यंदा कुलाब्याच्या ‘नेव्हन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ने बीएस्सी-होम सायन्स हा अभ्यासक्रम बंद करण्याची परवानगी विद्यापीठाकडे मागितली आहे. तर वडाळ्याच्या ‘विद्यालंकार अभियांत्रिकी महाविद्यालया’ला बायो-मेडिकल अभ्यासक्रम बंद करायचा आहे.
लाला लजपतराय महाविद्यालयाने आपल्याकडील कम्प्युटर सायन्स हा विषय बंद करण्यासाठी विद्यापीठाकडे अर्ज केला आहे. तर खेडच्या ‘घरडा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ला आयटी अभ्यासक्रम बंद करायचा आहे. ‘पेण एज्युकेशन सोसायटी’च्या महाविद्यालयाने तर ‘भूगोल’ विषयाच्या आपल्या सर्वच्या सर्व सहा तुकडय़ा बंद करण्याची मागणी केली आहे.
विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीने काही महाविद्यालयांना भेट दिली असता निराळेच चित्र समोर आहे. अनेक महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाशी शिक्षकांचे वर्षांनुवर्षे न्यायालयीन वाद सुरू असल्याने ही महाविद्यालये अभ्यासक्रम बंद करू इच्छितात.काही महाविद्यालये पुरेसे विद्यार्थी मिळत नसल्याने हे अभ्यासक्रम बंद करू इच्छितात, असे व्यवस्थापन समितीच्या एका सदस्याने सांगितले.