सरकारी शाळांकडे दुर्लक्ष करून खासगी शाळांना उत्तेजन दिल्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पुदुचेरीच्या सरकारवर टीका केली आहे.
तसेच या प्रकारचा निषेध नोंदवण्यासाठी व सरकारी शाळांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी ८ जून रोजी शिक्षण संचालनालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
पुदुचेरीतील सरकारी शाळांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक जुन्या इमारतींतील शाळांना नव्या जागा मिळण्यास अडचण येत आहे. सरकार शाळांना वह्य़ा-पुस्तके, गणवेश आदी साहित्य पुरवण्यास अक्षम ठरले आहे. सरकारी शाळांतील घटत्या शिक्षक संख्येचा परिणाम शिक्षणाच्या दर्जावर पडत असून अनेक शाळांचा निकाल घसरला आहे. असे असूनही सरकारी शाळांच्या समस्या सोडवण्याऐवजी सरकार खासगी शिक्षण संस्थांना प्रोत्साहन देत आहे आणि शिक्षण अधिकाराचा कायदा (आरटीई) राबवण्यास कुचराई करत आहे. याबद्दल माकपने सरकारवर टीका केली आहे.