अभियांत्रिकीच्या पदविकाधारकांपैकी ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी पदवीधरही होत आहेत. त्यामुळे पदविकाधारकांची (डिप्लोमा) उपलब्धता कमी होत असून बाजारपेठेसाठी आवश्यक असलेला पदवीधर, पदविकाधारक अभियंते आणि आयटीआय तंत्रज्ञ यांचे गुणोत्तर बिघडले आहे. मात्र खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पदवीच्या हजारो जागा रिक्त राहत असून ही महाविद्यालये पदविकाधारक विद्यार्थ्यांच्या प्रवेशामुळे तग धरून आहेत.
गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयांमधील जागा वाढत असून त्या पावणेदोन लाखांच्या घरात गेल्या आहेत. पदविकाच्या जागाही दीड लाखांपर्यंत आहेत. त्यामधून दरवर्षी एक लाखाहून अधिक पदविकाधारक अभियंते बाहेर पडतात. कंपन्यांमध्ये शॉप फ्लोअरवर सुपरवायझर, फोरमन व अन्य कामे करण्यासाठी पदविकाधारकांची आवश्यकता असते. पण पदवीच्या मुबलक जागा उपलब्ध असल्याने प्रथम वर्षांसाठीच ४० ते ५० हजार जागा रिक्त राहतात. त्यात प्रथम वर्षांत ६० ते ७० टक्के विद्यार्थी नापास होतात. पदविका उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षांला प्रवेश मिळतो. त्यामुळे द्वितीय वर्षांच्या जागा या पदविकाधारक विद्यार्थ्यांमुळे भरल्या जातात. नाही तर खासगी महाविद्यालये बंद पडू शकतात. पदविकाचे ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेतात. ज्यांना दुसऱ्या वर्षांला प्रवेश मिळत नाही, ते प्रथम वर्षांसाठीही मोठय़ा प्रमाणावर जागा रिक्त असल्याने तेथे प्रवेश घेतात. परिणामी पदविकाधारकांची संख्या कमी होत आहे.
अधिकाधिक विद्यार्थी उच्चशिक्षण घेतात, हे दिलासादायक आहे. पण बाजारपेठेतील किंवा कंपन्यांच्या तांत्रिक मनुष्यबळाच्या गरजा पाहता एक पदवीधर, तीन पदविकाधारक आणि आठ आयटीआय तांत्रिक कामगार, असे गुणोत्तर राखले जाणे आवश्यक आहे. पंतप्रधानांच्या तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या योजनेतही हे गुणोत्तर राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आयटीआय झालेल्यांना पदविकासाठीही प्राधान्याने प्रवेश मिळतो. मात्र ५-१० टक्के विद्यार्थी त्यानुसार प्रवेश घेतात. परिणामी एका पदवीधरामागे तीन पदविकाधारकाऐवजी हे प्रमाण एकास एक इतके झाले आहे. कंपनीमध्ये फोरमन, सुपरवायझर या कामांसाठी पूर्वी पदविकाधारक अभियंता उपलब्ध होत असे. पण आता नोकरीअभावी त्यासाठी पदवीधर अभियंतेही मिळत आहेत. हे पदवीधर त्या कामात मात्र मनापासून रस घेत नाहीत. सध्याच्या पदविकाधारकांचा अभ्यासक्रमही असा आहे की, त्यांचा कंपन्यांना लगेच उपयोग होत नाही व प्रशिक्षण द्यावे लागते. त्यामुळे आता पदविका अभ्यासक्रमामध्ये थेट कंपन्यांमध्ये जाऊन प्रशिक्षणाचीही सुरुवात करण्यात आली आहे. पदविकाधारक पदवीचे शिक्षण घेत असल्याने खासगी महाविद्यालयांसाठी ते ‘आधार’ ठरत असले तरी त्यामुळे बाजारपेठेतील गुणोत्तर बिघडत चालले आहे.