News Flash

अभियांत्रिकी प्रवेश केवळ ‘एमएचटी-सीईटी’तूनच!

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांकरिता ‘एमएचटी-सीईटी’ ही एकच सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

| August 30, 2015 05:27 am

प्रतिनिधिक छायाचित्र

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांकरिता ‘एमएचटी-सीईटी’ ही एकच सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश हे केवळ सीईटीतील गुणांच्या आधारे करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयावर अखेर राज्य सरकारने शनिवारी शिक्कामोर्तब केले. महत्त्वाचे म्हणजे ‘महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम, २०१५’मधील तरतुदीनुसार २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांपासून घेण्यात येणारी ही सीईटी राज्यातील खासगी विनाअनुदानित व अल्पसंख्याक संस्थांनाही बंधनकारक असेल. त्यामुळे, स्वतंत्र सीईटीचा आग्रह धरणाऱ्या खासगी व अल्पसंख्याक संस्थांना खासकरून वैद्यकीय महाविद्यालयांना सरकारने यामुळे दणका दिला आहे. सरकारच्या निर्णयामुळे सीईटीबाबतचा गोंधळ दूर झाला आहे. केंद्रीय स्तरावर होणाऱ्या सीईटींऐवजी राज्याच्या स्तरावर सीईटी घेऊन अभियांत्रिकी, औषधनिर्माण व वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश करण्याचे धोरण राज्य सरकारने यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार वैद्यकीय आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांकरिता राज्याच्या स्तरावर सीईटी होतच होती. परंतु अभियांत्रिकीबाबतच्या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नव्हते. तसेच अभियांत्रिकीचे प्रवेश बारावी व सीईटीच्या एकत्रित गुणांनुसार करायचे की केवळ सीईटीतील गुणांआधारे याबाबतचा गोंधळही कायम होता. सरकारच्या आदेशामुळे हा घोळ दूर झाला आहे. यानुसार २०१६-१७च्या अभियांत्रिकी, औषधनिर्माण व वैद्यकीयच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांकरिता आधीप्रमाणेच ‘एमएचटी-सीईटी’ ही एकच परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे तिन्ही अभ्यासक्रमांकरिता वेगवेगळी प्रवेश परीक्षा देण्याचा त्रास होणार नाही. तसेच खासगी विनाअनुदानित व अल्पसंख्याक संस्थांनाही एमएचटी-सीईटीच लागू करण्यात आल्याने वेगवेगळ्या विद्यार्थ्यांवरील वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांचा भारही कमी झाला आहे. अर्थात याबाबत खासगी संस्थांमध्ये नाराजी असून काहींनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे.

असे असेल परीक्षेचे स्वरूप

ही सीईटी राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. एमएचटी-सीईटीसाठी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र (प्रत्येकी ५० गुण) या दोन्ही विषयांकरिता सामाईक प्रश्नपत्रिका असेल. गणित व जीवशास्त्र (प्रत्येकी १०० गुण) या विषयांच्या स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील.

असे होतील प्रवेश

’अभियांत्रिकी, औषधनिर्माण व वैद्यकीय या तिन्ही अभ्यासक्रमांचे प्रवेश केवळ सीईटीतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) तयार करून केले जातील.प्रत्येक अभ्यासक्रमाकरिता स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल.अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरिता मात्र बारावीच्या परीक्षेतील भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञान किंवा व्होकेशनल यापैकी एक विषयात मिळून एकूण किमान ५० टक्के (मागासवर्गीयांकरिता ४५) गुण मिळविणे बंधनकारक राहील. अन्यथा विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरणार नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2015 5:27 am

Web Title: engineering admission only mht and ect examination
टॅग : Engineering
Next Stories
1 पुणे विद्यापीठाने ‘सेट’ पुढे ढकलल्याने अन्य परीक्षार्थीची पंचाईत
2 विद्यापीठांनी पायाभूत सुविधा,शिक्षकांची संख्या दर्शविणारी श्वेतपत्रिका काढावी राज्यपालांची सूचना
3 ‘एलएलएम’ला श्रेणी सुधार योजना लागू
Just Now!
X