हजारो अतिरिक्त शिक्षक समायोजनाच्या प्रतीक्षेत असताना त्यांना आता जानेवारी महिन्यात पगार होणार की नाही अशी चिंता लागली आहे. या शिक्षकांना डिसेंबर २०१४पर्यंत ऑफलाइन पद्धतीने वेतन द्यावे असे आदेश शासनातर्फे देण्यात आले आहेत.कायद्यातील तरतुदीनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे डिसेंबरअखेपर्यंत दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन करण्याचे शासनाने स्पष्ट केले होते. त्यांचे समायोजन होईपर्यंत म्हणजेच डिसेंबर २०१४पर्यंत त्यांचे वेतन ते ज्या शाळेतून अतिरिक्त ठरले त्या शाळेतून ऑफलाइन पद्धतीने काढावे असे नमूद करण्यात आले होते. डिसेंबर संपत आला तरी अनेक शिक्षकांचे समायोजन प्रलंबित आहे. अशा शिक्षकांना आता जानेवारी महिन्यापासून वेतन मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे जानेवारी महिन्यात शिक्षकांचे समायोजन करा किंवा समायोजन होईपर्यंत त्यांचे वेतन सुरू ठेवा अशी मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.