केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या अखिल भारतीय वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचा (एआयपीएमटी) निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत हरयाणा येथील विपुल गर्ग हा सर्वप्रथम तर राजस्थानातील खुशी तिवारी ही मुलगी दुसरी आली आहे. या दोघांनाही अनुक्रमे ७२० पैकी ६९५ आणि ६८८ गुण मिळाले.
मे महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनियमितता आढळून आल्याने ही परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली होती. या निर्णयानुसार परीक्षा २५ जुलै रोजी पुन्हा घेण्यात आली होती. देशभरातील ५० शहरांमधील १०६५ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेला ३ लाख ७४ हजार ३८६ विद्यार्थी बसले होते. यात एक लाख ८० हजार ९५७ विद्यार्थी आणि एक लाख ९३ हजार ४२९ विद्यार्थिनींचा समावेश होता. या परीक्षेअंतर्गत संपूर्ण देशाच्या १५ टक्के कोटय़ामधील एकूण तीन हजार ७२२ जागा भरण्यात येणार आहेत.
१५ टक्के जागा राखीव
देशातील इतर दहा राज्यांतील जागांपैकी १५ टक्के जागा ही परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३२ हजार ८६२ विद्यार्थिनींचा तर ३२ हजार ७२ विद्यार्थी उत्तीर्ण झोले आहेत. यापैकी गुणवत्ता यादीत आणि प्रतीक्षा यादीत एकूण १८ हजार ६१० विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती सीबीएसईने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आली आहे.