गुणवत्तेत अग्रेसर असेलल्या विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे अमेरिकेतील एमआयटीचा पहिला क्रमांक लागला आहे. क्वाक्वेरेली सायमंड्स यादी म्हणून ती ओळखली जाते. त्यात पहिल्या शंभरात एकही भारतीय विद्यापीठ नाही. दोन भारतीय संस्था पहिल्या दोनशेत आल्या असून त्यात बंगलोरची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स व दिल्लीची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांचा समावेश आहे. त्यांना अनुक्रमे १४७ व १७९ वा क्रमांक मिळाला आहे.
२०१५-१६ वर्षांसाठीची ही यादी असून त्यात हार्वर्ड दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. गेल्या वर्षी ते चौथ्या क्रमांकावर होते. या विद्यापीठाने केंब्रिजला मागे टाकले. एमआयटीने पहिला क्रमांक राखला आहे. इम्पिरियल कॉलेज लंडन या संस्थेला आठवा क्रमांक मिळाला आहे. ऑक्सफर्ड व युसीएल यांचीही घसरण झाली आहे. ब्रिटनने शिक्षण क्षेत्रात आपली आघाडी कायम ठेवली आहे.
लंडनची चार विद्यापीठे पहिल्या पन्नासात आहेत. बोस्टन व न्यूयॉर्कची प्रत्येकी दोन तर पॅरिस, सिडनी, हाँगकाँग व बीजिंगची प्रत्येकी दोन विद्यापीठे यादीत पहिल्या पन्नासात आहेत. लंडनचे महापौर बोरिस जॉनसन यांनी राजधानीतील विद्यापीठांचे कौतुक केले असून लंडन ही जगाची शैक्षणिक राजधानी असल्याचे म्हटले आहे.