निकालाचा दिवस जसजसा जवळ येतो, तसा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना ‘पुढे नेमकं काय?’ हा प्रश्न अधिक अस्वस्थ करतो. निकालानंतर पदवी प्रवेशाची समीकरणे सुस्पष्ट होत असली तरी त्याआधी पदवी अभ्यासक्रमांच्या विविध पर्यायांची सविस्तर माहिती विद्यार्थी-पालकांना असणे आवश्यक असते. दहावी-बारावीनंतर अभ्यासक्रमाची निवड करणे विद्यार्थ्यांना सुकर व्हावे, याकरिता दै. लोकसत्ताने गुरुवार, २९ मे आणि शुक्रवार, ३० मे रोजी पदवी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती देणारी कार्यशाळा आयोजित केली आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
या कार्यशाळेत दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना कला, विज्ञान, वाणिज्य, तंत्रज्ञान आदी विद्याशाखांमधील विविध अभ्यासक्रमांची माहिती ग्रोथ सेंटरच्या करिअर समुपदेशक मुग्धा शेटय़े आणि स्नेहल महाडिक करून देतील. करिअर निवडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, यावर प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत. सॉफ्ट स्किल्सची आवश्यकता आणि ही कौशल्ये कशी आत्मसात करावीत, यावर गौरी खेर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. कार्यशाळेचा समारोप ज्येष्ठ शिक्षक-प्रशिक्षक अनुराधा गोरे यांच्या उपस्थितीत होणार असून करिअरमधील यश आणि अभ्यासतंत्र या विषयावर त्या विवेचन करतील. या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थी-पालकांच्या अभ्यासक्रम निवडीसंदर्भातील प्रश्नांचे निरसनही करण्यात येईल. ही कार्यशाळा गुरुवार, २९ मे आणि शुक्रवार ३० मे अशी दोनदा आयोजित करण्यात आली असून दोन्हीही दिवशी होणाऱ्या कार्यशाळेचे विषय आणि वक्ते सारखे आहेत. या कार्यशाळेच्या ठिकाणी विविध अभ्यासक्रमांची, शिक्षण संस्थांची माहिती देणारे प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे. हे प्रदर्शन मोफत आहे, मात्र या कार्यशाळेचे प्रवेश शुल्क ५० रु. आहे. त्यात भोजनखर्चही समाविष्ट आहे. कार्यशाळेच्या प्रवेशिकेसाठी आणि अधिक माहितीसाठी ०२२- ६७४४०३६९ / ३४७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. कार्यक्रमाच्या प्रवेशिका रवींद्र नाटय़मंदिर येथे उपलब्ध आहेत.