मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांच्या निलंबनाविरोधातील लढा अधिक व्यापक करत विद्यापीठातील शिक्षणव्यवस्थेची झाडाझडती घेण्याचा निर्णय आता विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्यासाठी विविध विभागांमधील शिक्षणाची गुणवत्ता, साधनसामग्री, सोयीसुविधा यांची माहिती गोळा करण्याचे काम विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे. या माहितीच्या आधारे विद्यार्थी एक वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करणार असून तो एक प्रकारे विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ‘पोस्टमार्टेम’ अहवाल ठरणार आहे.
डॉ. हातेकर यांनी उपस्थित केलेल्या १४ मुद्दय़ांपैकी बहुतांश मुद्दे विद्यापीठाच्या घसरणाऱ्या शैक्षणिक दर्जाविषयी होते. विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक प्राधिकरणांवर करण्यात आलेल्या बेकायदा नेमणुकांविषयी ते गेली दोन-अडीच वर्षे सातत्याने विद्यापीठाकडे तक्रार करीत आहेत. या तक्रारींची दखल राज्यपालांनीही घेतली होती. मात्र त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्याविरोधात उभ्या राहिलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने कधी नव्हे इतके विद्यार्थी मोठय़ा संख्येने एकत्र आले आहेत.
या व्यापक आंदोलनाचा एक भाग म्हणून, विद्यापीठातील सर्व विभागांमध्ये भेटी देऊन विद्यार्थी तेथील समस्या जाणून घेणार आहेत. त्या आधारे आम्ही रितसर अहवाल तयार करू. विद्यापीठाच्या दर्जाचा आढावा घेणारा हा दस्तावेज ठरावा, असा प्रयत्न असल्याचे एक विद्यार्थिनी म्हणाली.
निलंबन सूडबुद्धीने केल्याचा आरोप ‘मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस’ ने केला आहे. संघटनेचे अमोल मातेले यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांना या कारवाईविरोधात निवेदन दिले.

दीक्षान्त समारंभात मूक निदर्शने
१२ जानेवारीला विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाच्या ठिकाणी विद्यार्थी डॉ. हातेकर यांच्या निलंबनाविरोधात काळ्या फिती लावून मूक निदर्शने करणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी निलंबन कारवाईचा निषेध म्हणून कार्यक्रमावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले आहे. अखेरचा पर्याय म्हणून साखळी उपोषण करण्याचा विद्यार्थ्यांचा विचार आहे.