यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठामार्फत नियमित पीएच.डी. सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच यापूर्वी ज्यांची पीएच.डी. २००९ च्या यूजीसीच्या मार्गदर्शक नियमांनुसार नाही, त्या विद्यार्थ्यांचे कोर्सवर्क पूर्ण झाल्यानंतर त्यांना पीएच.डी.चे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी पुढील शैक्षणिक वर्षांपासून ‘एमए इन मास कम्युनिकेशन जर्नालिझम’ शिक्षणक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. एमए शिक्षणक्रम अन्य विद्यापीठांच्या सहकार्याने सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांना पर्यावरणशास्त्राची ओळख, माहिती व्हावी म्हणून पर्यावरणशास्त्र विषयाचा पदवी शिक्षणक्रमांत समावेश करण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला. याबरोबरच कम्युनिटी कॉलेजसाठी प्रयत्न करण्याचे या बैठकीत ठरल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी दिली.