दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूपदी योगेशकुमार त्यागी
विश्वभारती विद्यापीठाचे कुलगुरू सुशांत दत्तागुप्ता यांना काढून टाकण्यास राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी परवानगी दिली आहे. केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूंना काढून टाकण्याची कारवाई बहुदा देशात प्रथमच करण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दत्तागुप्ता यांना काढून टाकण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे, कारण राष्ट्रपतींनी त्याला परवानगी दिली आहे. दरम्यान, दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर दक्षिण आशियायी विद्यापीठातील प्राध्यापक योगेशकुमार त्यागी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते दक्षिण आशियायी विद्यापीठात विधी विभागाचे अधिष्ठाता होते. चार जणांच्या नावातून राष्ट्रपतींनी त्यागी यांची निवड केली. विश्वभारती विद्यापीठाच्या कुलुगुरूंना हटविण्याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालय व राष्ट्रपतींमध्ये मतभेद होते.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी चार नावे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडे पाठवली होती; त्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक रामेश्वर नाथ कौल बामेझाई, आयआयटीचे माजी प्राध्यापक व केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य हेमचंद गुप्ता व दिल्ली विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक विद्युत चक्रबर्ती यांचा समावेश होता.
विश्वभारती विद्यापीठाचे कुलगुरू दत्तागुप्ता हे विश्वभारतीचे वेतन व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे निवृत्तिवेतन दोन्हीही घेत होते. त्यांनी फक्त विश्वभारती विद्यापीठाचे वेतन घेणे अपेक्षित होते असा आरोप त्यांच्यावर होता. दत्तागुप्ता यांनी नेमणुकातही गैरप्रकार केले होते व त्यात परीक्षा नियंत्रकाची नियुक्ती वादग्रस्त होती.

कायदा मंत्रालय आणि महाधिवक्त्यांचा सल्ला
राष्ट्रपतींनी विश्वभारती विद्यापीठाच्या कुलगुरूंना काढून टाकण्याची परवानगी दिली आहे. या महिन्याच्या सुरूवातीला मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दत्तागुप्ता यांना काढून टाकण्याबाबतची फाईल राष्ट्रपतींकडे पाठवली होती. त्याआधी कायदा मंत्रालय व महाधिवक्त्यांचा सल्ला घेण्यात आला होता. दत्तागुप्ता यांना काढून टाकण्याबाबतची फाईल राष्ट्रपतींनी दोनदा परत पाठवली. बाजू ऐकून न घेता कुलगुरूंना काढून टाकणे कायदेशीरदृष्टया योग्य आहे काय, अशी विचारणा त्या वेळी राष्ट्रपतींनी केली होती, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे प्रवक्ते घनश्याम गो.ल यांनी सांगितले.