सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत पुण्याची हर्षां चंद्रकांत भट्टड या विद्यार्थिनीने देशातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. मे-जून, २०१४मध्ये झालेल्या या परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात जयपूरचा संजय नावंधर हा विद्यार्थी ७२.८८ टक्के पटकावून देशातून पहिला आला आहे. तर तर जोधपूरचा कुणाला जेठानी हा ७२.५० टक्के गुण मिळवून दुसरा आला आहे. तर तिसरे स्थान मिळविणाऱ्या हर्षां हिने ७१.७५ टक्के गुणांची कमाई केली आहे.
सीएच्या दोन्ही ग्रुपसाठी देशभरातून ४२,५३३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३,१०० विद्यार्थी (७.२९टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर पहिल्या ग्रुपसाठी परीक्षा दिलेल्या ६५,७९२ विद्यार्थ्यांपैकी १३.५०टक्के म्हणजे ८,८८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दुसऱ्या ग्रुपची परीक्षा दिलेल्या ६५,७०६ विद्यार्थ्यांपैकी १०.६६ टक्के म्हणजे ७००४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीएचा निकाल आधीच्या म्हणजे नोव्हेंबर, २०१३मध्ये झालेल्या परीक्षेच्या तुलनेत चांगलाच वाढला आहे. तसेच, गुणात्मकदृष्टय़ाही २०१४चा निकाल २०१३च्या तुलनेत चांगलाच वाढला आहे.
‘द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’तर्फे (आयसीएआय) ही परीक्षा होते. अकाऊंटन्सी शिक्षणात जागतिक स्तरावर होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने आम्ही सीएच्या परीक्षेत बदल करीत असतो. जेणेकरून आपले सीए व्यावसायिक जागतिक स्तरावरील स्पर्धेलाही तोंड देऊ शकतील, असे आयसीएआयचे अध्यक्ष के. रघु यांनी सांगितले. त्याकरिता अकाऊंटन्सीचे शिक्षण आणि प्रशिक्षण यांचा आढावा घेणारी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आधुनिक आणि जागतिक तोडीचा नवीन अभ्यासक्रमही आयसीएआय तयार करीत आहे. जेणेकरून भारतातील सीएचे शिक्षण हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वश्रेष्ठ ठरू शकेल, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
आता तयारी ‘आयआयएम’ची
हर्षां भट्टडने फग्र्युसन महाविद्यालायतून अर्थशास्त्रात पदवी घेतली. तिच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान आहे. तिची बहीणही ‘सीए’ आहे. ‘सीए’च्या परीक्षेत चांगले यश मिळेल असे वाटले होते, पण देशपातळीवर यश मिळेल, देशात तिसरी येईन असे वाटले नव्हते. खूप छान वाटत आहे. आता ‘आयआयएम’मध्ये प्रवेश घेण्याचे लक्ष्य असून त्यासाठी ‘कॅट’ची तयारी सुरू आहे, असे हर्षांने सांगितले.