राज्य शासनाने वेतनेतर अनुदानापोटी मंजूर केलेले २६६ कोटी रुपये आठ दिवसांमध्ये शाळांपर्यंत पोहोचतील, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांना दिले. वेतनेतर अनुदान जाहीर करून शासनाने दिले नाही म्हणून गेले अनेक महिने ओरड होत होती. यावर अखेर आता पडदा पडला आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी मोते यांनी नागपूरात शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी मोते यांनी मांडलेल्या मागण्यांवर त्यांनी चर्चा करून निर्णय दिले आहेत. यामध्ये वेतनेतर अनुदानाबाबत चर्चा करताना दर्डा यांनी निधी शिक्षण संचालनालयाकडे पोहोचला असून संचालकांनी आठ दिवसांत त्याचे वाटप करावे, असे आदेश दिले. तसेच ठाणे जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तातडीने समजायोजन करावे, असे आदेशही त्यांनी या वेळी दिले. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी संख्येअभावी बंद झालेल्या तुकडय़ांमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजनही तातडीने करावे, ऑनलाइन मूल्यांकनासाठी मुदत ३१ जानेवारी पर्यंत वाढवावी असे निर्देशही शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. अशा अन्य काही प्रलंबित मुद्यांवर मंत्र्यांनी निर्देश जाहीर करून शिक्षकांना तसेच अनेक शाळांना दिलासा दिला आहे.