ओळखपत्रांची छपाई करणारी बहुतांश यंत्रे बंद असल्याने ‘भारतीय विज्ञान परिषदे’करिता नोंदणी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
विद्यापीठात ४५ वर्षांनी भरणाऱ्या या परिषदेत तब्बल १२ हजार विद्यार्थी, शिक्षक सहभागी होण्याची शक्यता आहे. मंगळवारी विद्यापीठाने या परिषदेकरिता नोंदणीची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी कलिना संकुलातील तीन स्वतंत्र शामियान्यात नोंदणीची सोय करण्यात आली आहे. मंगळवारी यापैकी एका शामियान्यात नोंदणी सुरू करण्यात आली. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक दिल्यानंतर त्यांचे त्याच ठिकाणी छायाचित्र काढले जाते.
त्यानंतर ते छायाचित्र ओळखपत्रावर छापले जाते. मात्र २० छपाई यंत्रांपैकी बुधवारी केवळ दोन यंत्रेच कार्यरत होती. तासाभराने यातले एक यंत्र बंद पडले. त्यामुळे एकाच यंत्राच्या साहाय्याने ओळखपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती.  एकाच यंत्रावर सर्व भार आल्याने विद्यार्थ्यांना ओळखपत्र मिळविण्यासाठी रांगेत तासन्तास उभे राहावे लागत होते.नोंदणीचे काम विद्यापीठातीलच काही विद्यार्थी-शिक्षकांच्या मदतीने करण्यात येत आहे. बराच वेळ लागत असल्याने त्यांनाच या नाराजीला तोंड द्यावे लागत आहे. याचा मनस्ताप नोंदणीकरिता आलेल्या अधिसभा सदस्य आणि शिक्षकांनाही झाला.