विद्यार्थ्यांना एमबीबीएस डॉक्टर होण्यासाठी आता आयआयटीतही संधी मिळणार आहे. आयआयटी खरगपूरने एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू केला आहे. तीन एकराच्या भूखंडावर २०१७ पर्यंत ‘बी.सी.रॉय इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड रिसर्च’ ही संस्था आकारास येणार असून तेथे ४०० खाटांचे रुग्णालयही असणार आहे. सरकारने त्यासाठी गेल्या वर्षी २३० कोटी रुपये मंजूर केले असून त्याचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल, ते २६ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे आयआयटी खरगपूरचे संचालक पार्थ प्रीतम चक्रबर्ती यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी आधीच एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी भारतीय वैद्यक परिषदेकडे परवानगी मागितली होती. आयआयटी खरगपूर ही संस्था अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रसिद्ध असून आता तेथे वैद्यक शिक्षणही मिळणार आहे.