ग्रामीण भागांत वैद्यकीय सेवा मिळणे दुरापास्त असल्याचे चित्र पालटण्यासाठी बीएससी (समूह आरोग्य) हा नवा महत्त्वाकांक्षी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांपासून तो सुरू करण्यास जी राज्ये राजी असतील तेथे तो सुरू केला जाणार आहे. लोकसभेत लेखी उत्तरात केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
आधी या अभ्यासक्रमाचे नाव ‘बॅचलर ऑफ रूरल हेल्थकेअर’ असे होते. मात्र मेडिकल काऊन्सिलशी झालेल्या चर्चेनंतर ते ‘बॅचलर ऑफ सायन्स (कम्युनिटी हेल्थ)’ असे केले गेले आहे. आता या नावातील ग्रामीण शब्दाऐवजी समूह आरोग्य शब्दप्रयोग केला गेल्याने हा पदवीधारक शहरातील आरोग्यसेवेतही भूमिका बजावू शकेल, असा तर्क मांडला जात आहे.
ग्रामीण भागांत आरोग्ययंत्रणा उभारण्यात येणाऱ्या आर्थिक अडचणी, मानवी बळ आणि उपकरणांची कमतरता हे सर्व लक्षात घेऊन गावपातळीपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचविण्याचा सुवर्णमध्य म्हणून सरकार या अभ्यासक्रमाकडे पाहात आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन यासारख्या काही वैद्यकीय संघटनांनी या अभ्यासक्रमास तात्त्विक विरोध केला आहे. मात्र देशात नागरिकांच्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या अतिशय कमी आहे. एक हजार नागरिकांमागे एकच डॉक्टर असून देशात साडेआठ लाख डॉक्टरांची टंचाई आहे. त्यामुळे सरकार या नव्या अभ्यासक्रमाबाबत आग्रही आहे.
प्रवेश कुणाला?
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाईल.
अभ्यासक्रमाची मुदत
हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून सहा महिन्यांची फिरती प्रशिक्षणार्थी उमेदवारी त्यात अंतर्भूत आहे.