दहावीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन भरून घेतलेल्या परीक्षा अर्जावर ‘प्रोसेसिंग’ करताना झालेल्या तांत्रिक घोळाचा फटका मुंबईतील २८ विद्यार्थ्यांना बसला होता. या गोंधळामुळे एकच आसनक्रमांक दोन विद्यार्थ्यांना दिला गेला होता. या विद्यार्थ्यांच्या निकालात गडबड होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीवरून त्यांच्या उत्तरपत्रिकेची ‘ओळख’ पटविण्याचे काम ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मंडळा’ने केले असून हा घोळ निस्तरण्यात आल्याचे मंडळाच्या मुंबई कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
अकरावी प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरताना हा घोळ काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. अकरावी ऑनलाइनसाठी अर्ज भरण्यापूर्वी आपला बैठक क्रमांक दिल्यानंतर भलत्याच विद्यार्थ्यांची माहिती संगणकावर येत होती. आपल्याऐवजी भलत्याच कुणाची माहिती समोर आल्याने विद्यार्थी चक्रावून गेले. शाळेमार्फत हा प्रकार मंडळाच्या लक्षात आणून देण्यात आला. या घोळाचा फटका ज्या विद्यार्थ्यांना बसला आहे त्यांनी मागणी केल्यास निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकाही दाखविल्या जातील, असे मुंबई मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी स्पष्ट केले.