विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञानाकडे वळावे या उद्देशाने केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे देशातील नऊ महाविद्यालयांना ‘स्टार महाविद्यालया’चा दर्जा देण्यात आला असून त्यांना एक कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिले जाते. या नऊ महाविद्यालयांमध्ये राज्यातील रुईया या एकमेव महाविद्यालयाचा समावेश आहे.
देशातील काही महाविद्यालयांना जैवतंत्रज्ञान विभागातर्फे  विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानाकडे वळविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी काही निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. यामध्ये रुईया महाविद्यालयाचाही समावेश होता. या निधीतून ज्या महाविद्यालयांनी चांगले काम केले अशा महाविद्यालयांचे सादरीकरण नुकतेच विभागात करण्यात आले. यानंतर विभागाने देशातील नऊ महाविद्यालयांना ‘स्टार महाविद्यालया’चा दर्जा दिला. या तीन वर्षांच्या कालावधीत रुईया महाविद्यालयाने वनस्पतिशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, पदार्थविज्ञान आणि प्राणिशास्त्र या विषयांमध्ये विविध कार्यक्रम राबविण्यापासून अनेक उपक्रम हाती घेतले होते. तसेच विद्यार्थ्यांना शिकविताना प्रात्यक्षिकाकडे विशेष भर देण्यात आल्याने हे शक्य झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयाला सध्या मिळालेल्या नव्या दर्जामुळे पुढील तीन वष्रे विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार असल्याचेही ते म्हणाले.