वाढलेले केस कापले नाही म्हणून मरोळच्या एका शाळेतील शिक्षिकेने आठवी आणि नववीच्या वर्गातील २० ते ३० मुलामुलींचे केस वर्गातच जबरदस्तीने भादरल्याची तक्रार संबंधित मुलांच्या पालकांनी ‘बाल हक्क संरक्षण आयोगा’कडे केली आहे. आयोगाने या तक्रारीची दखल घेत शाळेला नोटीस पाठविली असून त्यावर आयोगाच्या येत्या बैठकीत सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मरोळ येथील ‘सेंट जॉन एव्हँगलिस्ट’ शाळेत ७ फेब्रुवारीला हा प्रकार घडला. आमच्या मुलांचे केस शिक्षकांनी भर वर्गात भादरले, अशी पालकांची तक्रार आहे. या संदर्भात पालकांनी आयोगाकडे निनावी तक्रार दाखल केली आहे. पालकांनी तक्रार केल्याचे शाळेने मान्य केले आहे. मात्र, शिक्षकांनी मुलांचे केस भादरल्याचे त्यांनी नाकारले.
भर वर्गात इतर विद्यार्थ्यांसमोर आमच्या मुलांचे केस भादरण्याचा हा प्रकार छळवणुकीचा व अपमानकारक असल्याचे पालकांनी आयोगाकडे ई-मेलद्वारे पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शिक्षकांनी नाभिकाच्या मदतीने मुलांचे केस भादरल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
हा प्रकार आपल्या कानावर आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. मात्र, ‘शिक्षकांनी मुलांचे केस केवळ ‘ट्रिम’ केले होते. ते पूर्णपणे भादरले नव्हते,’ असे त्यांचे म्हणणे आहे. ‘शिक्षिकेच्या या कृत्याचे आम्ही समर्थन करीत नाही. कारण, शिक्षकांनी मुलांच्या केसांना हात लावण्याचा प्रश्नच येत नाही. मुलांचे केस योग्य पद्धतीने कापलेले नसतील तर शिक्षकांनी पालकांना बोलावून किंवा पत्र लिहून याची कल्पना देणे आवश्यक होते. माझ्या माहितीप्रमाणे शिक्षिकेने वेळोवेळी या गोष्टी केल्याही होत्या,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
या प्रकारामुळे विद्यार्थी प्रचंड घाबरले असून मोठय़ा तणावाखाली आहेत. शाळेत जाण्याचे नावही ती काढत    नाहीत. ‘शिक्षण हक्क कायद्या’त मुलांना कोणत्याही प्रकारची शारीरिक व मानसिक छळवणूक होईल, अशी शिक्षा करण्यास शिक्षकांना मनाई  आहे. या शिक्षिकेचे हे कृत्य कायद्याचेच उल्लंघन करणारे आहे.   विद्यार्थ्यांचे पालक