राज्यातील ‘क’ दर्जा मिळालेल्या अभिमत विद्यापीठांचा जीव अखेर भांडय़ात पडला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सादर केलेल्या अहवालात राज्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स या तीनही विद्यापीठांना क्लीनचिट मिळाली आहे. देशातील ४१ विद्यापीठांपैकी ३४ विद्यापीठांना या अहवालानुसार अखेर क्लीनचिट देण्यात आली आहे, अशी माहिती आयोगातील सदस्यांनी दिली.
देशातील अभिमत विद्यापीठांची पाहणी करण्यासाठी २००९ मध्ये नेमण्यात आलेल्या टंडन समितीने देशातील ४१ अभिमत विद्यापीठांना ‘क’ दर्जा देऊन या विद्यापीठांची मान्यता काढून घेण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगानेही या समितीच्या अहवालाला अनुषंगून अभिमत विद्यापीठांची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमली होती. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशांनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने या प्रकरणी अंतिम निर्णय घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सदस्यांची पुन्हा एक समिती नियुक्त केली. आधीच्या तिन्ही समित्यांनी ‘क’ दर्जा दिलेल्या देशातील ४१ विद्यापीठांपैकी ३४ विद्यापीठांना या अहवालात अभय देण्यात आले आहे.
टंडन समितीच्या अहवालानुसार ‘क’ दर्जा मिळालेल्या पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, सातारा येथील कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स या तीनही विद्यापीठांना सोमवारी सादर झालेल्या अहवालात अभय
देण्यात आले आहे.  
* ‘क’ दर्जा कायम ठेवलेली देशातील सातही विद्यापीठे ही तामिळनाडू आणि राजस्थानमधील आहेत.
* एकूण ४१ विद्यापीठांपैकी दहा विद्यापीठांना समितीने ‘अ’ दर्जा दिला आहे.
* अभय मिळालेल्या विद्यापीठांना दिलेल्या मुदतीत आयोगाने दाखवून दिलेल्या त्रुटी दूर करण्याचे आव्हान या विद्यापीठांसमोर राहणार आहे.
* याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेची अंतिम सुनावणी २५ सप्टेंबरला होणार आहे.