‘इवलेसे रोप लावियले द्वारी’ या संतांच्या उक्तीप्रमाणे एक छोटेसे रोप १८९६ साली महर्षी धोंडो केशव कर्वे (अण्णा) यांनी पुण्यातील हिंगणे- कर्वेनगर या ठिकाणी लावले. आज या छोटय़ाशा रोपाचा ‘कल्पवृक्ष’ झाला आहे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी आपलं सर्व आयुष्य वेचणाऱ्या भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या याच कल्ववृक्षांतील एक छोटासा भाग म्हणजे प्रा. म. ना. अदवंत प्राथमिक विद्यामंदिर हा होय.
१९९१ साली मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यातील कर्वेनगर येथे शाळेची स्थापना करण्यात आली. आज या शाळेस २१ वर्षे पूर्ण होत आहेत. सुरुवातीपासूनच सतत उपक्रमशील अशी ही छोटीशी शाळा. इयत्ता पहिली ते चौथी हा सर्व शिक्षणाचा, जीवनाचा पाया मानला जातो. याच वयात मुलांवर योग्य संस्कार करण्याची गरज असते आणि हा पाया भक्कम करण्याचे कार्य ही शाळा व येथील शिक्षकवृंद निष्ठेने पार पाडत आहेत.
विद्यार्थ्यांना आपले वाटतील असे सर्वार्थाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांतील ‘चैतन्य’ विकसित करून शालेय वातावरण आनंददायी व संस्कारमय करण्याचा प्रयत्न अदवंत प्रशालेत सतत केला जातो.
प्रशालेत राबविले जाणारे उपक्रम –
आषाढी एकादशी – या दिवशी शाळेतील सर्व मुली वेगवेगळ्या वेशभूषा करून येतात. कोणी ज्ञानेश्वर, कोणी तुकाराम तर कोणी मुक्ताई होतात, तर इतर सर्व वारकरी होतात. सजवलेल्या पालखीत विठ्ठलाची प्रतिमा ठेवून टाळ, विना व खांद्यावरील भगवा पताका उंचावत नामाच्या गजरात ही अदवंत संस्थानाची पालखी निघते. यात सर्व मुली आनंदाने सहभागी होतात.
या उपक्रमांप्रमाणेच एक आगळावेगळा उत्सव! उपक्रम दरवर्षी साजरा केला जातो तो म्हणजे ‘शारदोत्सव..’
शारदोत्सव – हा एकूण ४ दिवसांचा आनंद सोहळा असतो. या कालावधीतील सर्व उपक्रमांत मुलींबरोबरच पालकांचा व शिक्षकांचाही सहभाग असतो. यामध्ये देवीची आरास केली जात,े पण ती जरा वेगळ्या प्रकारे केली जाते. दरवर्षी पहिली ते चौथीच्या कोणत्याही एका विषयाच्या पाठय़पुस्तकातील घटकांवर आधारित आरास केली जाते. संपूर्ण पाठय़पुस्तकच प्रतीकात्मक रूपाने मुलींसमर मांडले जाते आणि हे सर्व मुली उत्साहाने व आनंदाने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करतात.
मागील वर्षी तिसरीच्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकावर आधारित ‘अश्मयुगीन माणसाची गोष्ट’ हा अश्मयुगीन माणसाचे जीवन उलगडून सांगणारी आरास/ देखावा मुलींनी मांडला होता. यमध्ये अश्मयुगीन माणसाची घरे, हत्यारे, चाकाचा शोध, शेती, तळ्यातील घरे इ. सर्वाचा समावेश होता.
हे सर्व त्या त्या इयत्तांमधील मुलींनी तयार केले व त्यांची मांडणी केली. यातून मुलींना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आज त्या त्यांचे विविध विषयांचे प्रकल्प नावीन्यपूर्णतेने करतात व मांडतात.
भाजी मंडई – यावर्षीपासून भाजी मंडी हा एक नवीन व नावीन्यपूर्ण उपक्रम आम्ही हाती घेतला. मुलींना दैनंदिन व्यवहार कसे होतात- उदा. खरेदी-विक्री, नफा-तोटा, वस्तूंच्या मापनांची परिमाणे यांविषयी फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्याचा वापर दैनंदिन जीवनात, व्यवहारात कसा करावा हे समजण्यासाठी हा उपक्रम राबविण्याचे ठरविले व त्याप्रमाणे नियोजन केले.
यामध्ये पालक-शिक्षक संघ सदस्य व इतर पालकांच्या मदतीने बाजारातून भाजीची खरेदी करण्यात आली. यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कांदे-बटाटे, शेंगा, मका, फुले इ.ची खरेदी करण्यात आली. शाळेच्या आवारात भाज्यांचे स्टॉल लावले. मुलींना तराजू उपलब्ध करून दिले. तसेच ही भाजी खरेदी करण्यासाठी सर्व पालकांना बोलविण्यात आले. यातील सर्व व्यवहार म्हणजे वजन करणे, पैसे घेणे, पैसे परत करणे, त्यांचा हिशोब ठेवणे ही सर्व कामे त्या त्या स्टॉलवरील मुलींनी स्वत: केली.
त्यामुळे त्यांच्या व्यवहारज्ञानात भरच पडली. पैशाची देवाण-घेवाण कशी करतात, हेही समजले. विशेष म्हणजे त्या दिवशी भाजी देण्यासाठी मुलींनी पर्यावरणास घातक अशा कॅरी बॅग न वापरता मुलींनीच स्वत: तयार केलेल्या कागदी पिशव्यांचा वापर केला. आणलेली सर्व बाजी तासाभरातच संपली हे विशेष.
बाहुलीचे लग्न ‘एक आनंद सोहळा’
लहान मुलींचा आवडता खेळ म्हणजे बाहुलीचं लग्न. शारदोत्सवातील शेवटच्या दिवशी बाहुलीच्या लग्नाचा सोहळा असतो. खऱ्या लग्नाप्रमाणेच सर्व गोष्टी यात केल्या जातात.
त्यांच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या जातात व सर्वाना आग्रहाचं निमंत्रण दिलं जातं. त्या बाहुला-बाहुलीला मुली सजवतात, तसेच त्यांच्यासाठीचं स्टेजही सजवलं जातं. रुखवत मांडतात, तसेच खऱ्या लग्नाप्रमाणे इथेही वाजतगाजत ढोल-ताशांच्या गजरात त्यांची वरात काढली जाते. त्यांना जवळच्या मंदिरात नेलं जातं, औक्षण केलं जातं व नंतर त्यांना बोहल्यावर उभं केलं जातं. मुली सर्व पाहुण्यांचं स्वागत करतात, त्यांना अक्षदा देतात. आंतरपाट धरला जातो. मंगलाष्टका म्हटल्या जातात व मुहूर्तावर लग्न लावलं जातं.
एवढय़ावरच न थांबता अहेराचा कार्यक्रम होतो. अहेर स्वीकारले जातात. आलेल्या सर्व पाहुण्यांना चिवडा-लाडू दिला जातो. मुलींनाही खाऊ दिला जातो व अशाप्रकारे लग्न-सोहळा पार पडतो. या उपक्रमाद्वारे शारदोत्सवाची सांगता होते.
प्रकल्प – मुलींना स्वच्छतेचे महत्त्व कळावे व कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी यावर्षी ‘कंपोस्ट खत प्रकल्प’ सुरू करण्यात आला. यामध्ये शाळेतील, शाळेच्या आवारातील कचरा टाकला जातो, तसेच मुलीही घरातील कचरा घेऊन येतात व यात टाकतात. यापासून तयार होणाऱ्या खतांचा वापर परिसरातील झाडांसाठी केला जातो.
याबरोबरच मुलींचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी व ज्ञानाच्या स्पर्धेत मुली मागे पडू नयेत यासाठी प्रशालेत अ‍ॅबॅकस, यू.के. इंग्लिश, स्पोकन इंग्लिश, एम.टी.एस., टि.म.वि. परीक्षांचे वर्ग शाळेत घेतले जातात, तसेच भारत स्काऊट-गाइड संस्थेमार्फत शाळेत बुलबुल पथक चालविले जाते.
या अशा उपक्रमामुळे मुलांना अभ्यासाबरोबरच काहीतरी नवीन करून दाखविण्याची संधी मिळते. या उपक्रमांप्रमाणेच मुली अभ्यासातही पुढे आहेत. स्कॉलरशिप परीक्षा निकाल १०० टक्केअसतो. या उपक्रमांबरोबरच मुलींच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही ना, याची काळजी घेतली जाते. त्यामुळे अभ्यासातही मुली अव्वल असतात.
– संकेत कुलकर्णी
सहाय्यक शिक्षक,
प्रा. म. ना. अदवंत प्राथमिक विद्यामंदिर,
कर्वेनगर, पुणे
कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे  उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी.
संपर्कासाठी पत्ता :
‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१. दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७  
reshma.murkar@expressindia.com,  
reshma181@gmail.com

Fraud by Ramdev Baba patanjali group by taking the land of farmers at cheap price
रामदेवबाबांकडून शेतकऱ्यांची जमीन स्वस्त दरात घेऊन फसवणूक! पतंजलीचे फूड, हर्बल पार्क कधी होणार?
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!