घसरता रुपया, भारतीय विद्यार्थ्यांची हत्या, काही धोरणात्मक निर्णय अशा विविध कारणांमुळे २०१३ मध्ये भारतातून ब्रिटनला शिक्षण घेणाऱ्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या घसरली आहे. युरोपीय देशांनी सन २०१३ मध्ये केवळ १३,६०८ भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा दिला होता. ही संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत २१ टक्क्यांनी कमी आहे. मात्र भारतातून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या एकूण प्रवाशांची संख्या सुमारे ५ टक्क्यांनी वाढली आहे.
ब्रिटनच्या नवीन व्हिसा केंद्राचे उद्घाटन बुधवारी वांद्रा कुर्ला संकुलातील व्यवहार केंद्रात झाले. अधिकाधिक लोकांना व्हिसा देण्याच्या उद्देशाने मुंबईत हे दुसरे केंद्र सुरू करण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना खूप कमी जागा आहेत असे अनेकांना वाटत असते. ब्रिटनचा व्हिसा मिळणेही अवघड असल्याचा अनेकांचा समज आहे. तसेच शिक्षणानंतर ब्रिटनमध्ये काम करता येत नाही असाही समज असल्यामुळेही विद्यार्थी संख्या घटल्याची शक्यता असल्याचे निरीक्षण भारतातील ब्रिटनचे उच्चायुक्त जेम्स बीवन यांनी नोंदविले. २०१३ मध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे १४,७६२ अर्ज प्राप्त झाले होते. ही संख्या २०१२ च्या तुलनेत २७ टक्क्यांनी कमी होती. डिसेंबर २०११ मध्ये झालेल्या अनुज बिडवेच्या हत्येनंतर विद्यार्थ्यांची संख्या रोडावली का, या प्रश्नाला उत्तर देताना बीवन म्हणाले की, ब्रिटन हा भारतीय विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर सर्वासाठीच सुरक्षित देश आहे. अशा काही घटना खूप क्वचित घडतात.
सन २०१३ मध्ये ब्रिटनने चार लाखांहून अधिक भारतीयांना व्हिसा दिला. यामध्ये पर्यटकांपासून व्यावसायिकांचाही समावेश आहे. ही संख्या मागील वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी जास्त असल्याचे उच्चायुक्तांनी सांगितले. भारतात व्हिसा अर्जापैकी ९० टक्क्यांना व्हिसा मंजूर केला जातो, असे ते म्हणाले. मध्यंतरी भारत ‘हाय रिस्क’ देशांच्या यादीत होता. ब्रिटन भारताकडे अजूनही याच नजरेने पाहतो का, या प्रश्नावर बीवन म्हणाले की, आमच्यासाठी प्रत्येक देश हा त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर महत्त्वाचा ठरत असतो. भारत कोणत्याही दृष्टीने ‘हाय रिस्क’ देश नाही, असेही त्यांनी सांगितल़े
हे केंद्र सुरू झाल्यामुळे मुंबईत आता ब्रिटनची दोन व्हिसा केंद्रे झाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्यंतरी ब्रिटनने आपल्या विद्यार्थी व्हिसा नियमांमध्ये बदल करून विद्यार्थ्यांना बाँड देणे सक्तीचे केले होते. परंतु, हा नियम यापूर्वीच मागे घेण्यात आल्याचे भारतातील ब्रिटनचे उच्चायुक्त जेम्स बीवन यांनी बुधवारी सांगितल़े

Web Title: Indian students reduced in britain
First published on: 14-03-2014 at 01:24 IST