व्हीआयटी युनिव्हर्सिटी प्रस्तुत आणि विद्यालंकार यांच्या सहकार्याने आयोजित ‘लोकसत्ता- मार्ग यशाचा’ या उपक्रमाचे आयोजन गुरुवार, ३० ऑक्टोबर आणि शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी ठाण्याच्या टिप टॉप प्लाझा येथे करण्यात आले आहे.
दहावी-बारावीनंतरच्या विविध पदवी अभ्यासक्रमांची ओळख करून देत करिअरच्या नवनव्या दिशांची माहिती या कार्यक्रमात देण्यात येईल, त्याचबरोबर याअंतर्गत अभ्यासाच्या ताणाचा, परीक्षेदरम्यान येणाऱ्या तणावाचा सामना विद्यार्थ्यांनी कसा करावा, पाल्याच्या करिअरमध्ये पालकांची भूमिका नेमकी कोणती, अशा महत्त्वाच्या मुद्दय़ांवर विद्यार्थी-पालकांसाठी मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. या उपक्रमादरम्यान शैक्षणिक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
    ३० ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबर रोजी या उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शनाची तीन सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. सुरुवातीच्या सत्रात ‘अभ्यास आणि परीक्षेच्या ताणतणावाला विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जावे?’ या विषयावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी मार्गदर्शन करतील. दुसऱ्या सत्रात शैक्षणिक सल्लागार असलेल्या मिथिला दळवी    ‘पाल्याच्या करिअरमध्ये पालकांची भूमिका नेमकी कोणती?’ या विषयावर बोलणार आहेत. अंतिम सत्रात दहावी-बारावीनंतरच्या विविध पदवी अभ्यासक्रमांची आणि करिअर संधींची ओळख ‘ग्रोथ सेंटर’च्या मुग्धा शेटय़े आणि स्नेहल महाडिक या करिअर समुपदेशक करून देतील.
प्रत्येक सत्रानंतर श्रोत्यांच्या निवडक प्रश्नांची उत्तरे वक्ते देणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी-पालकांना प्रत्येक वक्त्याला भेटता यावे, यासाठीही वेळ राखून ठेवला आहे. याठिकाणी शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात  विविध शिक्षणसंस्थांचे तसेच करिअर-परीक्षांचे मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल मांडलेले असतील.
*जे वक्ते ३० ऑक्टोबर रोजी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील, तेच ३१ ऑक्टोबर रोजी मार्गदर्शन करतील.
*ठाण्यात होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रत्येकी ५० रु. इतके प्रवेशशुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्कात भोजनपाकिटांचाही समावेश आहे.
*कार्यक्रमाच्या प्रवेशिका २५ ऑक्टोबरपासून सकाळी दहा ते सहा या वेळेत हॉटेल टिपटॉप प्लाझा, ठाणे येथे तसेच विद्यालंकार, ईशान  आर्केड-२, तिसरा मजला, हनुमान मंदिरसमोर, गोखले रोड, ठाणे (पश्चिम) येथे मिळतील. संपर्क:  ०२२-६७४४०३६९/३४७
*कार्यक्रमादरम्यान दोन दिवस मांडल्या जाणाऱ्या शैक्षणिक प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी स्टॉल्ससाठी मनाल साळगावकर यांना ९८२०७२७७०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Loksatta marg yashacha success key for thane student
First published on: 24-10-2014 at 04:16 IST