प्राध्यापक पदासाठीच्या इंग्रजी विषयासाठी घेण्यात आलेल्या ‘सेट’ परीक्षेतील दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची असूनही अंतिम उत्तरसूचीत ती कायम ठेवण्यात आल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या चुका लक्षात आणून दिल्यानंतरही विद्यापीठाने त्या दुरूस्त करण्याची तसदी घेतली नाही, हे विशेष.
नुकत्याच जाहीर झालेल्या ‘शिक्षक पात्रता चाचणी’च्या (टीईटी) परीक्षेतही अंतिम उत्तरसूचीत चुका केल्यामुळे हजारो उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला होता. आता सेट परीक्षेतही याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे, किमान निकाल जाहीर करताना तरी ही चूक सुधारावी, अशी मागणी परीक्षार्थीकडून होते आहे.
१ डिसेंबर, २०१३ रोजी पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा घेण्यात आली. परीक्षा झाल्यानंतर लगेचच उत्तरसूची जाहीर करण्यात आली. त्यात इंग्रजी विषयाच्या ‘पेपर क्रमांक ३’मधील अनेक प्रश्नांची उत्तरे चुकीची असल्याचे परीक्षार्थीचे म्हणणे आहे. दुस-या एका प्रश्नाचे उत्तर दोन पर्यायात असल्याने हा प्रश्न रद्द करण्यात यावा, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. या दोन्ही प्रश्नांबाबत पुणे विद्यापीठाची पहिली उत्तरसूची प्रसिद्ध झाल्यानंतर कळविण्यात आले होते. त्याची दखल घेत हे प्रश्न रद्द करून सुधारित उत्तर सूची जाहीर करणे अपेक्षित होते.
विद्यापीठाने १४ मार्च, २०१४ला सुधारित आणि अंतिम उत्तरसूची जाहीर केली. मात्र त्यात चुकीच्या उत्तरांमध्ये कोणताही बदल केला नाही. अंतिम उत्तर सूचीमध्ये या प्रश्नांची चुकीचीच उत्तरे कायम ठेवली आहेत, असे ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे म्हणणे आहे.
सेटचा निकाल एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात अपेक्षित आहे. किमान निकाल जाहीर करताना तरी विद्यापीठाने अंतिम उत्तरसुचीमधील चुकांची दखल घेत त्यानुसार निकाल लावावा, अशी मागणी एका परीक्षार्थीने केली. ‘पेपर क्रमांक ३’मधील ‘६’ व ‘११’ क्रमांकाच्या प्रश्नाची उत्तरेही संदिग्ध असल्याची तक्रार एका
उमेदवाराने केली.

विद्यापीठाचा हास्यास्पद खुलासा!
अंतिम उत्तरसूचीबाबत शंका असल्यास परीक्षार्थीनी त्या आमच्यापर्यंत कळवाव्यात. त्याची दखल आम्ही घेऊ, असा हास्यास्पद खुलासा विद्यापीठाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने केला आहे. पण, अंतिम सूचीनंतरही दुरुस्तीचे सोपस्कार उमेदवारांना करावे लागत असतील तर पहिल्यानंतर दुसरी आणि अंतिम उत्तरसूची जाहीर करण्याचे प्रयोजनच काय, असा सवाल उमेदवारांकडून करण्यात येत आहे. पहिल्या उत्तरसूचीतील दुरुस्तीबाबत कळवूनही त्याची दखल जर दुसऱ्या सूचीत घेतली जात नसेल तर ती आताही घेतली जाईल, हे कशावरून अशी रास्त शंका एकाने उपस्थित केली.