विद्यापीठाने सुरू केलेल्या श्रेयांक पद्धतीनुसार विद्यार्थ्यांचे ४० गुण महाविद्यालयांच्या हाती आल्यानंतर आजवरची नामांकित महाविद्यालयांची निकालांमधील मक्तेदारी मोडीत निघाली आहे. पोदार, जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्था आदी नावे यंदा पार मागे पडली असून फारशा प्रसिद्ध नसलेल्या महाविद्यालयांनी बाजी मारली आहे. मात्र या महाविद्यालयांचा दर्जा घसरल्याने नव्हे तर ४० गुणांच्या किमयेनेच हे घडत असल्याचे बोलले जात आहे.
मार्च-एप्रिल महिन्यातील झालेल्या परीक्षांमध्ये विविध शाखांमध्ये पहिले दहा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बीकॉममध्ये मागच्या वर्षी दहा क्रमांक मिळवणारे पोदार कॉलेज  यंदा बीएमएसमध्ये दोन आणि एमकॉममध्ये एक इतकेच क्रमांक मिळवता आले आहेत. तर  जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेच्याही एकाही विद्यार्थ्यांला गुणवत्ता यादीत स्थान मिळले नाही. याबाबत मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. मधु नायर यांनीही विद्यार्थ्यांची नावे पुकारण्यापूर्वी आश्चर्यकारक रित्या यंदा कल्याण येथील साकेत महाविद्यालयाला सर्व क्रमांक मिळाल्याचा उल्लेख केला. विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या श्रेयांक पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना ४० पैकी गुण हे महाविद्यालयाच्या मार्फत दिले जातात. आपल्या महाविद्यालयाचा निकाल चांगला लागावा यासाठी अनेक प्राचार्यानी विद्यार्थ्यांना चांगले गुण द्यावेत, असे शिक्षकांना सांगितल्याचे समजते. दरम्यान, महाविद्यालये काय करतात याकडे लक्ष देण्यापेक्षा अंतर्गत मूल्यांकन आणि लेखी परीक्षेचे गुण यांचे समानीकरण होण्यासाठी ‘स्केलिंग डाऊन’ पद्धती आवश्यक असल्याचा उल्लेख डॉ. नायर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. ही पद्धती लागू केल्यावर श्रेयांक पद्धत खऱ्या अर्थाने वापरता येऊ शकेल आणि सध्या होत असेलेल गोंधळ होणार नसल्याचेही ते म्हणाले. बीकॉमध्ये यंदा डहाणूकर महाविद्यालयाचा मयुर धारप या विद्यार्थ्यांने बाजी मारली आहे.

रुईयाची ‘कलात्मक’ बाजी
रूईया महाविद्यालयाने कला शाखेत बाजी मारली असून दहा पैकी चार क्रमांक हे आपल्या नावावर केले आहे. तर संस्कृत विषयातील तिनही बक्षिसे, फ्रेंच विषयात तीन, अर्थशास्त्रात दोन, इतिहासात, राजकीय विज्ञान या विषयांत प्रत्येकी एक तर मानसशास्त्रात दोन अशी बक्षिसे मिळवली आहेत. यामुळे यंदा रुईया महाविद्यालयाची मान उंचावली आहे.

एमकॉममध्ये मुलींची आघाडी
वाणिज्य शाखेत एमकॉममध्ये पहिल्या स्थानावर दूरस्थ शिक्षण विभागाची रेणू वझिराणी या विद्यार्थिनीने बाजी मारली असून दुसऱ्या स्थानावर पोदार कॉलेजची भूमिका शाह या विद्यार्थिनीने बाजी मारली आहे. तर तिसऱ्या स्थानावर निर्मला फाऊंडेशनची प्रीती अगरवाल हिने बाजी मारली आहे.