‘डिजिटल लॉकर्स’च्या माध्यमातून विद्यापीठाचा पुढाकार
मुंबई विद्यापीठ आपल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकांची तपासणी सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देणार आहे.
‘मायइजीडॉक्स’च्या साहाय्याने ‘ग्लोबल डॉक्युमेंट ऑथेंटिफेशन नेटवर्क’ या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना आता पदवी व गुणपत्रिका पडताळणीची सेवा ऑनलाइन मिळणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना डिजिटल लॉकर्सची सोय उपलब्ध करून दिली आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून ही सुविधा सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना व विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना ही सेवा देणारे मुंबई विद्यापीठ हे भारतातील पारंपरिक विद्यापीठांपैकी पहिले ठरले आहे.
या सेवेअंतर्गत सुरुवातीला २०१५ची पदवी प्रमाणपत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यानंतर जाहीर होणाऱ्या निकालाच्या गुणपत्रिका या योजनेद्वारे उपलब्ध होणार असून येत्या शैक्षणिक वर्षांपासून पूर्णपणे कार्यान्वित केली जाणार आहे. यामुळे शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी जलद व सोपी होण्याबरोबरच इतर शैक्षणिक संस्थांमध्ये गुणपत्रक पडताळणीसाठी लागणारा वेळ वाचणार आहे.
गुणपत्रिका सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयार करताना वॉटरमार्क पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना त्या कुठेही छपाई करता येतील. आजच्या स्पर्धात्मक युगात गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र याची सत्यता आणि सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने हे एक पाऊल टाकले आहे, असे कुलगुरू संजय देशमुख यांनी या योजनेमागील हेतू स्पष्ट करताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online checking of degree certificates
First published on: 09-12-2015 at 03:44 IST