विद्यार्थी मित्रहो, परीक्षेत अभ्यास जितका महत्त्वाचा असतो, तितकीच परीक्षा हॉलमधील कृतीही महत्त्वाची असते. यापेक्षाही परीक्षा हॉलमधील अडीच तासांत आपण परीक्षेला किती आत्मविश्वासपूर्वक सामोरे जातो हे अतिशय महत्त्वाचे ठरते. टीईटी परीक्षा ही जशी माहिती व ज्ञानाची परीक्षा असते, तशीच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेची उलटतपासणी करणारीदेखील असते. चांगला अभ्यास असूनदेखील प्रत्यक्ष परीक्षेत मनोधैर्य खचल्यामुळे अनेक विद्यार्थी अपात्र होतात. परीक्षेची भीती, पालकांच्या अपेक्षांचे ओझे, अभ्यासाचा ताण, निकालाविषयीची वाटणारी चिंता इ. कारणांमुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचते. म्हणूनच या काळात आपला आत्मविश्वास टिकवून ठेवून परीक्षेला प्रभावी रीत्या सामोरे जाणे महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने टीईटी परीक्षा हॉलमधील वेळेचे व्यवस्थापन व नियोजन योग्य रीतीने करणे गरजेचे ठरते.
स्वत:ची तयारी आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप या आधारे आपण प्रश्नपत्रिकेतील कसे प्रश्न सोडवायचे हे ठरवावे. यामुळे ज्या प्रश्नांची उत्तरे अजिबातच माहिती नाहीत असे प्रश्न वाचण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा वेळेची बचत करून इतर विषयाच्या प्रश्नांची उकल करण्यावर लक्ष केंद्रित करा तसेच प्रत्यक्ष प्रश्न सोडवताना वेळेच्या बाबतीत दक्ष असणे आवश्यक ठरते. एकाच प्रश्नावर आवश्यकतेपेक्षा अधिक वेळ खर्च करू नये. कोणत्याही प्रश्नासाठी अनावश्यक वेळ दिला जाणार नाही हे पाहावे. प्रश्नपत्रिकेचे अर्थात प्रत्येक विषयाच्या प्रश्नाचे अचूक वाचन ही कळीची बाब आहे. त्यामुळे प्रश्नांचे वाचन करताना त्यातील शब्द व त्यांचा अर्थ काळजीपूर्वक लक्षात घ्यावा. त्याचप्रमाणे प्रश्नाखाली दिलेले पर्यायदेखील काळजीपूर्वक वाचावेत. निष्काळजी व घाईमुळे चुकीचे वाचन, आकलनामुळे संबंधित प्रश्नांची उत्तरे हमखास चुकणार हे नक्की. प्रश्नपत्रिकेची उकल करीत असताना लक्षात घ्यावयाची आणखी एक मुख्य गोष्ट व तांत्रिक बाब म्हणजे उत्तरपत्रिकेत उत्तरे छायांकित करताना आपण बरोबर प्रश्नाच्या पुढेच छायांकित करीत आहोत का, याची खातरजमा करणे गरजेचे असते. अन्यथा विनाकारण मोठी चूक होण्याची शक्यता असते.
प्रश्नपत्रिका सोडवताना बऱ्याचदा सलग चार-पाच प्रश्नांची उत्तरे अजिबातच जमत नाहीत हे लक्षात येते. त्यामुळे अनेकांना दडपण निर्माण होते तसेच मनोधैर्यावर विपरीत परिणाम होतो. असे लक्षात आल्यावर दडपण न घेता पुढील प्रश्नांकडे जावे. नेहमी ध्यानात घ्या, की ही आपल्या मानसिकतेची चाचणी आहे. गणित व इंग्रजी विषयाच्या बाबतीत एखाद्या प्रश्नाची उकल करताना आपण गरजेपेक्षा अधिक वेळ व्यतित करण्याची शक्यता असते. अशा वेळी तो प्रश्न टाळून पुढे जाणे केव्हाही चांगले. काही प्रश्नांच्या बाबतीत दोन पर्यायांमध्ये गोंधळ वाटतो. अशा वेळी पेन्सिलीद्वारा एखादी खूण करून पुढे जाणे. शेवटी वेळ मिळाल्यास अशा प्रश्नांकडे परत लक्ष देणे शक्य आहे.
आपल्या बुद्धी व विचारशक्तीवर ताण वा दडपण नसल्यास आपण फार पूर्वी वाचलेली एखादी माहिती पटकन आठवते. त्यामुळे प्रश्न सोडवताना त्याचा उपयोग होतो. नाही तर दडपणामुळे तासाभरापूर्वी वाचलेली माहितीदेखील आपल्याला आठवत नाही. त्यामुळे आपल्या आत्मविश्वासावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
या परीक्षेसाठी सर्वसमावेशक व सखोल अभ्यास करणाऱ्या, खऱ्या अर्थाने कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. कारण त्यांनी मिळविलेले अभ्यास साहित्य व योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण उजळणी आणि नियोजनबद्धपणे विषयांच्या प्रश्नांच्या सरावामुळे निश्चितच अंतिम यशापर्यंत घेऊन जातील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल यात शंकाच नाही.
परीक्षेसाठी तुम्हाला मनस्वी हार्दिक शुभेच्छा!

हे लक्षात ठेवा
*परीक्षेच्या आदल्या दिवशी स्वत: तयार केलेल्या नोट्स, प्रश्न यांचे धावते वाचन करावे.
*परीक्षेच्या ठिकाणी वेळेवर पोहोचा. परीक्षा केंद्र, त्याचे ठिकाण, पोहोचण्यासाठी लागणारा वेळ या सगळ्याची आधीच माहिती करून ठेवा.
*परीक्षा केंद्रावर आपल्याकडून कोणालाही त्रास होणार नाही, कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रश्नपत्रिका सोडविताना योग्य रणनीतीचा वापर करावा.
*प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा.
*प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडवताना ज्या प्रश्नांच्या अचूक उत्तराबाबत खात्री असते, तेवढय़ाच प्रश्नांची उत्तरे अगोदर लिहावीत.