अगदी आपल्या वाटणाऱ्या पदार्थाचं मूळ परदेशी असतं तर परक्या देशातून आलेल्या एखाद्या पदार्थाचं कूळ आपल्याच प्रांतात सापडतं. आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा हा प्रयत्न.

एखादा पदार्थ जन्माला येतानाच विलक्षण लोकप्रियतेचं भाग्य पदरी घेऊन येतो. त्याला वेगवेगळ्या देशांच्या पाकसिद्धीचे असे कंगोरे जोडले जातात की, प्रत्येकालाच त्या पदार्थावर आपला हक्क दाखवणं गौरवास्पद वाटू लागतं. असं भाग्य घेऊन जन्माला आलेला पदार्थ म्हणजे चिकन टिक्का मसाला. हॉटेलमध्ये सामिष भोजनाचा आस्वाद घेणाऱ्या मंडळींसाठी हा पदार्थ म्हणजे अगदी खासच. काही माणसं नित्यनियमाने आपल्या उठण्याबसण्यात असतात. तरीही त्यांचा कंटाळा न येता ती कायम खास राहतात. चिकन टिक्का मसाला याच वर्गात मोडतो. कारण असंख्य वेळा चव चाखूनही दरवेळेस त्याच नवेपणाने आपण त्याच्याकडे सरकतो.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

आपल्या खाण्यात टिक्का लोकप्रिय होण्याचा काळ अलीकडचा असावा. तशा तर विविध प्रांतातील अनेक खास पारंपरिक डिशेस आपल्या स्वयंपाकघरात सलगी करू लागल्या आहेत; पण चिकन टिक्का मसाला ही काही पावभाजी वा इडली सांबारसारखी डिश नव्हे. एखादी हौशी कलाकार सुगरण वगळता आपल्या पानात टिक्का विराजमान होण्यासाठी हॉटेलपंगतीचा योगच बहुतांश वेळा यावा लागतो. ही डिश तशी लहानांपासून कवळीधारी ज्येष्ठांपर्यंत सर्वानाच प्रिय आहे. त्याचं कारण शोधत आपल्याला थेट मुगल काळापर्यंत मागे जावं लागतं.

अशी कथा सांगितली जाते की, मुगल सम्राट बाबर आजारी असताना त्याला मांसाहारी जेवण तर हवे होते; पण कोंबडीचे हाडूक गळ्यात अडकू नये याचीही चिंता होती. त्यामुळे त्याने आपल्या पंजाबी खानसाम्याला हाडकाशिवाय अर्थात बोनलेस डिश बनवण्याची आज्ञा दिली. त्यात प्रयोग करता करता ही चिकन टिक्का मसाला डिश अवतरली. मुगलांची खवय्येगिरी, तंदूरप्रेम पाहता ही फार अशक्य गोष्टही नसावी. पण आश्चर्य म्हणजे मधल्या दीर्घ काळात या डिशबद्दल ना फार बोलले गेले ना लिहिले गेले. त्यानंतरची या पदार्थाविषयीची कथा अगदी अलीकडच्या काळातली आहे. तीसुद्धा भारतीय भूमीतली नाही तर स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरातील आहे. या शहरतील शीशमहल हॉटेलचे शेफ अली अहमद अस्लम यांच्याशी ही कथा जोडली गेली आहे. एके रात्री खूप उशिरा एक ब्रिटिश माणूस या हॉटेलमध्ये भोजनासाठी गेला. त्याने चिकन डिश मागवली. मात्र समोर आलेली डिश खूपच कोरडी असल्याचे सांगून त्याने परत पाठवली. शेफ अली अहमद यांना तेव्हा युक्ती सुचली आणि कुठल्याही हुशार शेफप्रमाणे त्यांनी उपलब्ध टोमॅटो सूप, काही मसाले आणि दही यांचा वापर करून तीच कोरडी चिकन डिश नव्याने सजवून त्या ब्रिटिश माणसाला दिली. त्याला ती इतकी आवडली की तो वारंवार त्यानंतर त्या पदार्थासाठी त्या हॉटेलमध्ये जाऊ लागला. चिकन टिक्का मसालाशी जोडलेली ही आणखी एक कथा. अली अहमद यांचे पुत्र असीफ अली यांनी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेला हा किस्सा आहे.

तिसरी कथा जोडली गेली आहे दिल्लीच्या करीम हॉटेलचे शेफ जईमुद्दीन अहमद यांच्याशी. त्यांच्या मते, शेवटचा मुगल राज्यकर्ता बहादूर शहाजफर याच्याकडे बल्लवाचार्य म्हणून काम करणाऱ्या गृहस्थाने करीम हॉटेलची स्थापना केली आणि त्यांना चिकन टिक्का मसाला ही डिश मोगलांच्या रसोईतील पारंपरिक पदार्थ म्हणून अवगत होती. तीच त्यांनी सर्वासाठी खुली केली. याहीपलीकडे काही पाकतज्ज्ञांच्या मते, चिकन टिक्का मसाला हा गेल्या ५० वर्षांत पंजाब वा उत्तर प्रदेशात निर्माण झालेला पदार्थ आहे. तर काहींच्या मते, बांगलादेशी शेफने ब्रिटिशांच्या देशात तयार केलेली ही डिश आहे.

या सगळ्या जंजाळातून नेमकी खरी कथा कोणती हा प्रश्न उरतोच. काही वेळा बघा एखादा पदार्थ विशिष्ट काळात निर्माण होतो पण लोकप्रिय होत नाही. काही काळानंतर एखादा बल्लवाचार्य जुनीच पाककृती अक्कलहुशारीने नव्या रूपात आणतो. तो पदार्थ लोकप्रिय होतो. चिकन टिक्का मसालाच्या बाबतीत असंच झालं असावं. हा पदार्थ मुगल काळात निर्माण होऊन मधल्या काळात पुन्हा नव्याने चर्चेत आला आणि लोकप्रिय झाला. जगभरात ही डिश भारतीय म्हणूनच प्रसिद्ध आहे. पण तरीही महत्त्वाची नोंद म्हणजे २००१ साली ब्रिटनचे मंत्री रॉबीन कुक यांनी या पदार्थाला ब्रिटनची ‘राष्ट्रीय डिश’ म्हणून सन्मानित केले होते.

या पदार्थाची लोकप्रियता ते कधी, कुठे, कुणी निर्माण केली याच्यापलीकडे जाऊन अबाधित आहे. आपल्यापैकी अनेकांचा हा अनुभव नक्की असेल. आज कुछ नया ट्राय करते है, असं म्हणून आपण हॉटेलमध्ये जातो. हजार पदार्थावर नजर फिरवतो आणि शेवटी चिकन टिक्का मसालाच मागवतो. हॉटेल वा शेफ प्रसिद्ध असो अथवा अप्रसिद्ध, इस टिक्केसे पेटही नही मनभी भरेगा हा विश्वास या पदार्थाने आपल्या मनात निर्माण केलाय. खरं ना?