छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) विविध समस्यांबाबत शासन, प्रशासन यांच्याकडून फारशी गांभीर्याने दखल घेतली जात नाही. यामुळेच थंडावलेले आंदोलन पुन्हा करण्याचा निर्णय येथे सीपीआर बचाव कृती समितीच्या बठकी घेण्यात आला. २२ डिसेंबर रोजी सीपीआर आवारात ठिय्या आंदोलन तर १७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
शाहू स्मारक भवन येथे आयोजित बठकीच्या अध्यक्षस्थानी कृती समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक होते. मुळीक म्हणाले, सीपीआरमधील व्हेंटेलेटर, सीटी स्कॅन मशिन, हृदयरोग विभाग यांसह विविध प्रश्नांवर कृती समितीने आंदोलन केले आहे. जिल्हा नियोजन समितीमधून व्हेंटेलेटरला निधी मिळाला, त्याचे टेंडर निघाले पण ते केव्हा मिळेल याचा नेम नाही. हृदयरोग विभागातील कॅथलेटीक मशीन धुळखात आहे. तर आलेला निधीही पडून आहे. राज्य शासन व सीपीआर प्रशासनाच्या ठिम्म कारभारामुळे सीपीआरचे प्रश्न सुटलेले नाहीत. जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेतून ५१ कोटी रुपये आले. त्यापकी फक्त ८० लाखच सीपीआरमध्ये आले. याचा अर्थ सीपीआर रुग्णालयात येणारे अनेक रुग्ण या योजनेपासून दूर राहिले आहेत. ही बिकट परिस्थित सोडविण्यासाठी आता निकराचे आंदोलन करावे लागणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व सीपीआर आवारात ठिय्या आंदोलन करण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
जीवनदायीचे भ्रष्ट रॅकेट
राजीव गांधी जीवनदायी योजनेत खासगी डॉक्टरांचे रॅकेट आहे. सीपीआरमधील रुग्णांना खासगी रुग्णालयात नेऊन या योजनेतून पसा लाटला जात आहे. कृती समितीने याबाबत आंदोलन करून हे रॅकेट उघड करूया, असे मत दिलीप देसाई यांनी व्यक्त केले.
वाईट प्रशासनामुळे सीपीआरमध्ये कोणत्याही सुधारणा होताना दिसत नाही. सीटी स्कॅन मशिन, एमआरआय कधी येणार याचा नेम नाही. यासाठी आता आरपारची लढाई करावी लागणार असे मत बाबा इंदूलकर यांनी व्यक्त केले.