आजरा नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीवर मात

कोल्हापूर जिल्ह्यच्या राजकारणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना वरचढ ठरले आहेत. आजरा नगरपंचायत निवडणुकीत भाजप नेतृत्वाखाली आजरा शहर विकास आघाडीने तुल्यबळ काँग्रेस- राष्ट्रवादीसह शिवसेनेवर मात करून याचा प्रत्यय दिला आहे.

तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत स्थापन करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार आजरा येथे नगरपंचायत स्थापन करण्यात आली असून येथे नगरपंचायतीसाठी प्रथमच निवडणूक झाली. भाजप प्रवेश केलेले आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आजरा नगरपंचायतीची स्थापना सप्टेंबर महिन्यात करण्यात आली.

या निवडणुकीत भाजप नेतृत्वाखाली आजरा शहर विकास आघाडी, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा एक गट अशी आघाडी आणि भाजपमधील नाराज व शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर गटाची परिवर्तन आघाडी असा तिरंगी मुकाबला चुरशीने रंगला. या छोटेखानी पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी धाबा संस्कृती, महागडय़ा भेटवस्तू आणि रोख रकमांचे वाटप याला ऊत आला होता. १२,३९२ पकी १०,१७५ म्हणजेच ८२ टक्के मतदान झाले. आजरा शहर विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह १०  जागा मिळवीत सत्ता काबीज केली. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचा एक गट असलेल्या आघाडीला ६ तर परिवर्तन आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्षपदी  ताराराणी आघाडीच्या ज्योस्ना चराटी विजयी झाल्या. अशोक चराटी यांनी कन्येला निवडून आणून आपले अस्तित्व ठळक करतानाच विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा दावा केला.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले होते. शहरी भागातील महानगरपालिका, नगरपालिका असोत की ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती येथे कमळ प्रथम क्रमांकावर राहिले. भाजपच्या वाढत्या  प्रभावाला रोखण्यासाठी ‘ठाणे पॅटर्न’ राज्यात राबवण्याच्या प्रयत्न विरोधकांनी राबवला. त्याची पुनरावृत्ती कोल्हापुरात या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाली. काँग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन बलाढ्य पक्षांनी एकत्र येत आघाडी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, शिवसेनेचे संभाजी पाटील गट यांनी आव्हान निर्माण केले. या दोन्ही आघाडीसमोर भाजपचे ज्येष्ठ कार्यकत्रे जनार्दन टोपले, शिवसेनेचे शहरप्रमुख विजय थोरवत यांच्या परिवर्तन आघाडीने राजकीय समीकरणाला नवा आयाम दिल्याने निवडणुकीची रंगत वाढली. या निवडणुकीत जिल्ह्यतील नेतृत्वाची कसोटी लागली. नगरपंचायत स्थापनेचे श्रेय घेत सत्ता मिळवण्याचे प्रयत्न भाजपने शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सुरू ठेवले. सर्वच पक्ष, बंडखोर यांना बंडखोरांनी आव्हान दिले होते. चुरशीच्या या रणसंग्रामात सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या कार्यभूमीत भाजपच्या शहर विकास आघाडीने यशाचा झेंडा फडकावला.

भाजपची विजयी पताका

कोल्हापूर जिल्ह्यत भाजप आपली मुळे अधिकाधिक रोवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे याही निवडणुकीत दिसून आले. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रभुत्व असलेल्या जिल्ह्यत भाजपने नेत्रदीपक यश मिळवले होते. आजरा नगरपंचायतीचा निकाल भाजपाची विजयी पताका अद्यापही फडकत असल्याचा सांगावा देणारा आहे. पालिकेच्या निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांना हात घालण्यापेक्षा मोदी-फडणवीस सरकारचे अपयशी धोरण यावर विरोधकांचा भर होता. तर चराटी यांनी संयत भाषा वापरात वैयक्तिक संपर्क ठेवला. याचवेळी प्रचारात कशाची कमतरता राहणार नाही याची काटेकोर काळजी घेतली. असा हा प्रचार भावल्याने भाजप नेतृत्वाखाली आजरा शहर विकास आघाडीला सत्तासोपान गाठणे शक्य झाले.

कमळाला हुलकावणी

आजरा नगरपंचायतीमध्ये भाजपने विजयश्री घेचून आणल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. केंद्र-राज्यातील सरकार अपयशी ठरल्याची ओरड विरोधकांनी आता बंद करावी. प्रत्येक निवडणूक भाजपाला यश मिळवून देत आहे, हे नव्याने सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. भाजपने यशाचा दावा केला असला, तरी या निवडणुकीत कमळ चिन्हाला विश्रांती दिली होती. कमळाची पेरणी करण्याचे सत्र भाजपाला या निवडणुकीमध्ये थांबवावे लागले. याचे वास्तव मात्र वेगळेच असून ते जातीय-धार्मिकतेमध्ये लपले आहे. आजरा शहरात सुमारे ४० टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लीम मतदार आहेत . मुस्लीमबहुल मतदारसंघात कमळाची जादू चालणार नाही, याची साशंकता असल्याने येथे भाजपचे पक्षचिन्ह निवडणूक रिंगणातून गायब करण्याची खेळी भाजपने खेळली.

विधानसभेवर परिणाम

तीन विधानसभा मतदारसंघांत विभागला गेलेला आजरा तालुका राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचा आहे . येथून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ (कागल), राष्ट्रवादीच्याच संध्यादेवी कुपेकर (चंदगड) आणि शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे निवडून आले आहे. ताजा निकाल पाहता या भागात भाजपाला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या तिन्ही मतदारसंघांत भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार, त्यासाठी हा निकाल बळ देणारा ठरू शकतो.