पॅनकार्ड सक्तीसह अन्य जाचक नियमाविरोधात बुधवारी शहरातील सराफ बाजार पूर्णत: बंद ठेवण्यात आला. तर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. हुपरी, गडिहग्लज, कागल, राधानगरी, शिरोळ येथे बंदला पाठिंबा मिळाला. तर इचलकरंजीत बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. राज्यातील सराफ संघटनेतील मतभेदाचा परिणाम बंदवर जाणवला.
‘बंद’च्या पाश्र्वभूमीवर कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बठक झाली. संघाच्या कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बठक झाली. या वेळी अध्यक्ष ओसवाल म्हणाले, केंद्र सरकारने दोन लाख रुपयांवरील सोने-चांदीच्या खरेदीसाठी पॅनकार्ड तसेच अर्ज क्रमांक ६० आणि ६१ भरून घेणे सक्तीचे केले आहे. शिवाय सहा वष्रे अशी कागदपत्रे सांभाळून ठेवावी लागणार आहेत. पॅनकार्ड नसलेल्या ग्राहकांना दोन लाखांवर सोने खरेदी करता येणार नाही. रोख खरेदीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, त्यातून व्हॅट, आयकरामध्ये तूट येण्याची शक्यता आहे. सराफ व्यवसाय कोलमडून पडणार आहे. हे टाळण्यासाठी या जाचक नियमांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे.
शहरातील सर्व सराफ व्यावसायिक, सुवर्णकार कारागीर, बंदमध्ये समाविष्ट झाले होते. यामुळे बाजारात शुकशुकाट जाणवत होता. गुजरी पेठेतून रॅली काढण्यात आली. ती महाद्वार रोड, भेंडेगल्लीसह शहराच्या विविध भागात फिरून पुन्हा गुजरीत आली. खासदार धनंजय महाडिक व खासदार राजू शेट्टी यांना दूरध्वनीवरून बंदची माहिती देऊन मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.