विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीचे केंद्र रविवारी उपराजधानी नागपूरच्या दिशेने सरकले. सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार असल्याने राज्यातील प्रमुख नेत्यांसह जिल्हय़ातील इच्छुक उमेदवारांचा मुक्काम नागपूरमध्ये पडला आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या हालचाली गतिमान केल्या असून रविवारचा सुट्टीचा दिवस प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत नियोजन करण्यात घालवला.
स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधानपरिषदेच्या कोल्हापूर जिल्हय़ातील एका जागेची उमेदवारीची स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी चार इच्छुक उमेदवारांशी प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण यांनी संवाद साधत एकोपा राखण्याबरोबरच बंडखोरी टाळण्याचा सल्ला दिला होता. तथापि, उमेदवारीबाबतचा निर्णय नवी दिल्लीतून होणार असल्याचे सांगितल्याने इच्छुकांनी कोल्हापूर गाठले.
उमेदवारी मिळण्याची खात्री वाटत असल्याने सतेज पाटील व प्रकाश आवाडे या माजी मंत्र्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे निश्चित केले आहे. त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज आणला आहे. रविवारी या दोघांनीही प्रमुख कार्यकर्त्यांची बठक घेऊन अर्ज भरण्याचे नियोजन केले. या दोघांसह जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील हे रात्री नागपूरकडे रवाना झाले. नागपूरमध्ये सोमवारी हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून पहिल्याच दिवशी काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरविले असून विधिमंडळावर पक्षाचा भव्य मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये आपली भागीदारी दिसावी यासाठी जिल्हय़ातील इच्छुकांनी आपल्या समर्थकांना वाहनांची सोय करून उपराजधानीस पाठविले आहे. एका परिने हे इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन ठरणार आहे.
मोर्चा व अधिवेशनाच्या निमित्ताने काँग्रेसचे प्रमुख नेते सोमवारी नागपूरमध्ये असणार आहेत. प्रदेशअध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हाती उमेदवारीचा निर्णय असल्याने इच्छुकांनी त्यांची भेट घेऊन आणखी एकदा उमेदवारीची गळ घालण्याचे ठरविले आहे.
युतीही रिंगणात
आतापर्यंत विधानपरिषद निवडणुकीची चर्चा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीभोवती मर्यादित होती. मात्र रविवारी भाजप-शिवसेना या राज्यातील सत्तारूढ पक्षामध्ये जागा वाटप निश्चित झाले. त्यामुळे कोल्हापूर मतदारसंघातील युतीचा उमेदवार असणार हे निश्चित झाले असून ही जागा भाजपाकडे असल्याचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगितले. भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांस संधी देणार की काँग्रेसच्या बंडखोरास मदत करणार याकडे आता लक्ष लागले आहे.