News Flash

निवडणूक न लढण्यावरून चंद्रकांतदादांचे घूमजाव

पाटील यांनी भूमिका बदलल्याने स्थानिक कार्यकर्त्यांतही हुरूप आला आहे.

चंद्रकांत पाटील

यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर करून धक्कातंत्राचा वापर करणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुसऱ्याच दिवशी घूमजाव केल्याने त्यांच्या बोलण्यामागचा उद्देश काय, असा सवाल केला जात आहे. पाटील यांनी भूमिका बदलल्याने स्थानिक कार्यकर्त्यांतही हुरूप आला आहे.

पाटील यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह असताना गुरुवारी ‘यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही’, असे विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली. ‘दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत,’ अशी मागणी कोल्हापुरातील कार्यकर्त्यांकडून काही राजकीय कार्यक्रमांत जाहीरपणे झाली आहे. पण, आता दादांनीच यापुढे लोकसभा, विधानसभा, पदवीधर मतदारसंघ अशी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे घोषित केल्याने कार्यकर्ते गोंधळले होते.

केंद्र आणि राज्याची सत्ता मिळवलेल्या भाजपने पुन्हा सत्तासंपादन करण्याचा इरादा व्यक्त केला आहे.  मागील निवडणुकीइतकी सहजसोपी परिस्थिती आता राहिलेली नाही. अशातच मित्रपक्ष  शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवतानाच निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यातून दोन्ही पक्षांची युती झाली तर मंत्री पाटील यांच्यासमोर मतदारसंघ निवडीचा मोठा गुंता आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ात विधानसभेचे १० मतदारसंघ असून त्यात सहा जागी सेनेचे तर दोन जागी भाजपचे आमदार असल्याने येथे विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार हे उघड आहे. राहता राहिले दोन मतदारसंघ. तेथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यातील कागलमध्ये पाटील यांनी म्हाडा, पुणेचे अध्यक्ष समरजितसिंघ घाटगे यांना लढण्यास सांगितले आहे. मग उरतो तो चंदगड हा पार दक्षिणेकडील मतदारसंघ. येथे संध्यादेवी कुपेकर या आमदार आहेत.  त्यामुळे ‘कोणता मतदारसंघ घेऊ  हाती’ अशी अवस्था दादांची झाली आहे.

पाटील मूळचे राधानगरी तालुक्यातील. राधानगरी किंवा कोल्हापूर उत्तरमधून पाटील लढतील असे भाजपचे कार्यकर्ते सांगतात. राधानगरीचे सेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी तर पाटील यांना ‘दादांनी आपल्याविरुद्ध निवडणूक लढवूनच दाखवावी, असे आव्हान दिले आहे.

कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि पाटील यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. पाटील यांच्याविरोधात क्षीरसागर यांनी अनेकदा टोकाची भूमिका घेतली आहे. आता गणेशत्सव काळात स्पीकरची भिंत लावण्याच्या मुद्दय़ावरून दोघांत  झालेली खणाखणी तर याचे ताजे उदाहरण आहे.

टोमणे आणि विधान परिषद

चंद्रकांत पाटील हे पदवीधर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. आता या मतदारसंघातून सहकार भारतीमध्ये काम केलेले सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर (कराड) यांनी तयारी चालवली असून त्यालाही पाटील यांनीच हिरवा कंदील दाखवला असल्याचे दावा ते करतात. त्यांनी ५० हजार सभासद केले असून दोन लक्ष सभासद नोंदणीचे उद्दिष्ट असल्याचे ते सांगतात. त्यामुळे या मतदारसंघातून निवडून जाण्याचा मार्गही कुंठित आहे. मुख्य म्हणजे, पाटील यांना विधान परिषदेतून निवडून गेल्यामुळे विरोधकांच्या टोमण्यांचा मारा सतत सहन करावा लागतो. शरद पवार यांनीही ताज्या दौऱ्यात पाटील यांना याच मुद्दय़ावरून जखमेवर मीठ चोळले होते. तर काल क्षीरसागर यांनी ‘आपण दोन वेळा जनतेतून निवडून आलो आहोत, असे तीनदा सांगत पाटील यांना यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. ही स्थिती पाहता पाटील यांना विधानसभेत जायचे तर मतदारसंघ निवडीचा गुंता, अडसर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 12:54 am

Web Title: chandrakant patil 4
Next Stories
1 ‘आणीबाणीतील कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसेनानीचा दर्जा द्या’
2 कोल्हापुरात गणेशोत्सवासाठी प्रशासनाकडून उपाययोजना
3 यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही- चंद्रकांत पाटील
Just Now!
X