21 November 2019

News Flash

कोल्हापुरातील रखडलेले पाणी प्रकल्प तातडीने मार्गी लावणार-चंद्रकांत पाटील

उंचगी व अन्य प्रकल्पांचे कामही येत्या काळात पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

जिल्ह्यतील धामणी, उचंगी यासह सहा रखडलेले पाणी प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे बोलताना दिली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४५ व्या  जयंतीनिमित्त मंत्री पाटील यांनी कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देऊन शाहूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, महापौर सरिता मोरे, आमदार सतेज पाटील, कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी  दौलत देसाई, महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन गिरी, ज्येष्ठ विचारवंत डॉ.जयसिंगराव पवार, वसंतराव मुळीक उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराजांच्या अनेक गोष्टी समाजाला दिशादर्शक आहेत. त्यातील महाराजांच्या पाणी धोरणानुसार कमी पाणी व जास्त पिकांचे उत्पादन करण्यासाठी येत्या काळात भर दिला जाणार आहे,असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, राजर्षी शाहूंचा पाणी साठे वाढविण्यावर भर होता. कोल्हापूर जिल्ह्यमध्ये पाणी प्रकल्पांची कामे सुरु आहेत. त्यातील सहा प्रकल्प सद्यस्थितीत रखडलेले आहेत. या प्रकल्पात सर्वात मोठा धामणी प्रकल्प गतीने पूर्ण  करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे. उंचगी व अन्य प्रकल्पांचे कामही येत्या काळात पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांनी शाहू जन्मस्थळवर सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला.

दसरा चौक चित्रमय

दसरा चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजर्षी  छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला मंत्री  पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सामाजिक न्याय विभागातर्फे समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शाहू महाराजांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. हलगी व लेझीम पथक, शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित लक्षवेधी चित्ररथासह ‘शाहू महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

First Published on June 27, 2019 1:09 am

Web Title: chandrakant patil water project kolhapur abn 97
Just Now!
X