सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीचा सल्ला घेणे बंद करावे आणि शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिला. आ. जयंत पाटील यांनी ऊस उत्पादकांच्या पॅकेजमध्येही डल्ला मारला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरकार सत्तेवर येण्यापूर्वी सहकारमंत्री पाटील यांनी अनेक आश्वासने शेतकऱ्यांना दिली होती. एक वर्षपूर्ती झाली तरी या आश्वासन पूर्तीसाठी शासन काही करीत असल्याचे दिसत नाही. मात्र प्रत्येक वेळी बारामतीमधून सल्ले घेत असल्याचे दिसते. शेतकऱ्यांचे भले करायचे असेल, तर त्यांनी बारामतीला न जाता आमच्या संघटनेकडे यावे असे आवाहन त्यांनी केले.
ऊस उत्पादकांच्या एफआरपीबाबत ते मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत आहेत. हा खोटारडेपणा त्यांनी बंद करावा असे सांगून श्री. खोत म्हणाले, की सहकार खात्याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावे. आ. जयंत पाटील यांनी गेल्या वर्षी उसाला ३ हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र केंद्र शासनाकडून मिळालेल्या पॅकेजमध्येही कपात करून डल्ला मारला आहे. एफआरपीची मोडतोड करण्याची भाषा केली जात असली, तरी स्वाभिमानी हे सहन करणार नाही. साखरेचे भाव बाजारात वाढत आहेत, यामुळे रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार जसा भाव वाढेल त्याप्रमाणात जादा दर मागितला जाईल. जयसिंगपूरच्या मेळाव्यानंतर आंदोलनाची दिशा स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.