आगामी उन्हाळ्यात उद्भवणा-या पाणीटंचाईच्या नियोजनार्थ आयोजित इचलकरंजी नगरपरिषदेच्या विशेष सभेकडे राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस जांभळे गटाचे सदस्य न फिरकल्याने शनिवारची इचलकरंजी नगरपरिषदेची विशेष सभा गणपूर्ती अभावी रद्द झाली. विशेष म्हणजे नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनीही पक्षादेशाचे तंतोतंत पालन करत सभागृहात न जाणे पसंत केले. जनतेच्या जिव्हाळ्याचे अत्यंत महत्त्वाचे विषय असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सभेला गरहजर राहिले यासारखे दुर्दैव नाही, असे सांगत शहर विकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला. तर महत्त्वाचे अनेक विषय असताना काही तरी करत असल्याचा आव आणून आघाडीकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. तर एक महिला चांगले काम करत असतानाही केवळ व्हिप लागू करून मला कोंडीत पकडण्याची खेळी काँग्रेसकडून केली जात असल्याचे नगराध्यक्षा बिरंजे यांनी सांगितले.
आगामी उन्हाळ्यात भासणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे या प्रमुख विषयावर अन्य ११ विषयांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी नगराध्यक्षा बिरंजे यांनी विशेष सभा आयोजित केली होती. मात्र काँग्रेसच्या सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा सूर काँग्रेसमध्ये असल्याने सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन या बठकीस कोणत्याही सदस्याने हजर न राहण्याचा निर्णय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने घेतला होता. तसा पक्षादेश (व्हिप) पक्षप्रतोद सुनिल पाटील यांनी सर्व सदस्यांना बजावला. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील जांभळे गटाच्या सदस्यांना पक्षप्रतोद रवींद्र माने यांनी तोंडी व्हिप बजावला होता.
शनिवारी सकाळी ११.१५ वाजता शहर विकास आघाडीचे १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस मदन कारंडे गटाचे तीन मिळून १९ सदस्य सभागृहात उपस्थित होते. अर्धा तास उलटल्यानंतर अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी गणपूर्तीअभावी ही विशेष सभा रद्द केली जात असल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी पक्षप्रतोद अजितमामा जाधव यांनी महत्त्वाचे विषय असतानाही संबंधित खात्याचे अनेक अधिकारी गरहजर असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
आरोग्य, पाणी, पालिका कर्मचारी, शिक्षण मंडळ शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश, पाणीटंचाई असे महत्त्वाचे विषय असतानाही काँग्रेस व राष्ट्रवादीतील सदस्य गरहजर राहिले. केवळ व्हिप लागू केल्यामुळेच ही सभा रद्द झाल्याचे सांगून आघाडीचे पक्षप्रतोद अजितमामा जाधव म्हणाले, एकिकडे जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करत दुसरीकडे त्यामध्ये अडथळे निर्माण केले जातात. याची प्रचिती यापूर्वीही अनेकदा आलेली आहे. केवळ राजकारण करून कोणतेही काम होऊ नये ही वृत्ती सोडली पाहिजे, अशी टीकाही जाधव यांनी यावेळी केली. यावेळी जयवंत लायकर, महादेव गौड, तानाजी पोवार, मदन झोरे, विठ्ठल चोपडे आदी उपस्थित होते.
काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनिल पाटील यांनी, शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न असतानाही आम्हाला विश्वासात न घेता विषयपत्रिका काढली गेली. आपण काही तरी जनतेसाठी करतो असा आव आणत आघाडीकडून केवळ प्रसिध्दीसाठी नाटक केले जात आहे. आजपर्यंत जनतेच्या जिव्हाळ्याच्या कामात काँग्रेसने नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. पण आघाडीकडून त्याचेही राजकारण केले जात आहे. नगरसेवक शशांक बावचकर यांनी पाण्याच्या प्रश्नावर मागील ३-४ वर्षांपासून सभागृहात नेहमीच चर्चा होते. मात्र कृती शून्य असून अधिका-यांनी वेळेत काम केले तर कोणतेच काम उरणार नाही. पंचगंगा नदी प्रवाहित ठेवण्याचे काम आमदार, खासदारांचे असल्याचे सांगून हाळवणकर यांनी शहरातील रस्त्यांसाठी बांधकाम खाते, इंदिरा रुग्णालय राज्य सरकारकडे तर पाण्यासाठी जीवन प्राधिकरण यांच्यावर विश्वास दाखविला आहे. मग पालिकेचे अस्तित्व काय, असा सवाल उपस्थित केला यावेळी उपनगराध्यक्ष रणजित जाधव, बाळासाहेब कलागते, श्रीरंग खवरे, रत्नप्रभा भागवत आदी उपस्थित होते.
मी काँग्रेस पक्षाचीच नगराध्यक्षा असून महत्त्वपूर्ण विषयावरच आजची सभा बोलविली होती असे सांगून नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी, व्हिप लागू करून मला कोंडीत पकडण्याचा डाव टाकला जात आहे. व्हिप हे एकमात्र हत्यार त्यांच्याकडे आहे. चांगल्या कामात सहकार्य करण्याऐवजी मला अडचणीत आणण्याचा हा दुबळेपणा आहे. बिनबुडाचे आरोप होत असतील तर जशास तसे उत्तर देण्यास मी सज्ज असल्याचा सज्जड इशाराही बिरंजे यांनी दिला.