देशातील सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. संसदेत मंजूर झालेले विधेयक त्या दिशेने पडलेले पाऊल असताना त्याला विरोध करून काँग्रेस शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. बाजार समितीमधून मलिदा लाटण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, असा आरोप केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी येथे केला.

दानवे म्हणाले, “स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकारकडे येऊन दहा वर्षे झाली तरीही तत्कालीन काँग्रेस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. मोदी सरकारने शेतकरी हित समोर ठेवून धडाधड निर्णय घेतले. शेतकऱ्याची उत्पन्न वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सुधारित कृषी विधेयक आणून शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. आता शेतकरी चिंतामुक्त होणार आहे. त्याच्या मालाचे मार्केटिंग करण्याचा अधिकार मिळालेला असल्याने योग्य भाव मिळणार आहे.”

“इतके सारे फायदे असताना केवळ राजकारणासाठी काँग्रेसने विरोध चालवला आहे. बाजार समित्या बंद पडतील अशी पोकळ अवई उठवण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील एकही बाजार समिती बंद पडणार नाही. उलट देशभरातील व्यापारी माल खरेदी करण्यासाठी बाजार समितीत येतील हेच काँग्रेसचं दुखणं आहे. बाजार समितीमधील आपली मक्तेदारी नष्ट होईल याची त्यांना भीती वाटत आहे,” असा आरोप दानवे यांनी केला.