दयानंद लिपारे

चीनमध्ये थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचे परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होऊ लागले आहेत. भारत आणि चीन या दोन देशांमधील कापूस व सूत यांच्या आयात-निर्यात व्यवहारावर याचा गंभीर परिणाम झाला असून, चीनला होणारी कापूस व सुताची निर्यात थांबली आहे. तर, यापूर्वी झालेल्या व्यवहाराचे पैसे चीनमधून येत नसल्याने आर्थिक व्यवहारही ठप्प झाले.

भारतातून चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात कापसाची निर्यात होते. या हंगामात चीनला ४ लाख गाठी कापूस निर्यात करण्यात आला आहे. तर,या महिन्यांमध्ये चीनमध्ये सुमारे ५ लाख गाठी निर्यात होण्याची अपेक्षा होती. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने चीनमधील कापूस निर्यातीवर परिणाम झाला आहे. निर्यात होणारा कापूस भारतात अडकून पडल्याने देशांतर्गत साठा वाढला आहे. परिणामी, भारतीय बाजारपेठेतील कापसाचे दर घसरत आहेत. या आठवडय़ाभरात सुमारे प्रति खंडी ४ हजार रुपये कापसाचे भाव घसरले आहेत. सुमारे ४२ हजार रुपये खंडी असणारा कापूस आता ३८ हजार रुपयांना विकला जात आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. चीनमधील आपत्कालीन परिस्थितीमुळे याआधी निर्यात झालेल्या कापसाचे पैसे भारतात येणे थांबले आहे. परिणामी वस्त्रोद्योगातील आर्थिक व्यवहारावर दूरगामी परिणाम जाणवणार असल्याचे त्यांनी सांगितले.