महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी पाच विद्यार्थिनींसह नऊ जणांविरोधात येथील शाहुपुरी पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.
स्मिता उत्तम खांडेकर या सांगोला तालुक्यातील विद्यार्थिनीने ७ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. विवेकानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने पेइंग गेस्ट म्हणून राहात असलेल्या खोलीमध्ये आत्महत्या करताना एक चिठ्ठी ठेवली होती. त्यामध्ये सहकारी विद्यार्थिनीच्या टोमण्यांमुळे व शारीरिक त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते. यावरून तिची आई कमल खांडेकर (रा. महूर, ता. सांगोला) यांनी येथील शाहुपुरी पोलीस ठाण्यामध्ये स्मिताच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. पोलिसांनी तपास करून पाच विद्यार्थिनींसह विजय नरळे (रा. नरळेवाडी), राजाराम आलगर (रा. गळेवाडी चौकी), यशवंतराव गोडसे (रा. गायगवाण) व अशोक नरळे (रा. लक्ष्मीनगर) या सांगोला तालुक्यातील नऊ जणांविरोधात स्मिताच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्यावरून गुन्हा दाखल केला असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. जाधव यांनी दिली.