कोल्हापूर : संसदेत मंजूर केलेले शेतकरीविरोधी कायदे रद्द करावे यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी येथे विविध १२ संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध नोंदवत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा दोन वेळा प्रयत्न झाला. या वेळी आंदोलक व पोलिसांत झटापट झाली.

केंद्र शासनाने मंजूर केलेले तीन कायदे हे शेतकरी आहेत; ते रद्द करावेत यासाठी  आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत आज देशभर काळा दिन पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. येथील बिंदू चौकात भाजपवगळता बारा पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित आले. त्यांनी भाषणात पंतप्रधान मोदी हे शेतकरीविरोधी भूमिका घेत असल्याचे सांगत त्यांचा निषेध नोंदवला.

या वेळी शेतमालाला हमी भाव मिळावा, करोनाग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, रवी जाधव, संभाजी जगदाळे, गुलाबराव घोरपडे, सचिन चव्हाण आदी सहभागी झाले होते. आंदोलकांनी पंतप्रधानांचा प्रतीकात्मक पुतळा दोन वेळा दहन करण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी पुतळा हिसकावून घेतला.