कोल्हापूर: सध्या राज्यात नवनवे राजकीय वादंग निर्माण होताना दिसत आहेत. सर्वात आधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना अभ्यास नसलेले छोटे नेते असं म्हटलं. ते प्रकरण थोडं शमत भाजपाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी राज्यात लवकरच सत्ताबदल होऊन भाजपाची सत्ता येईल असं वक्तव्य केलं. तशातच आज एका सभेनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याचे वक्तव्य केलं. एक महत्त्वाचा बदल केल्यास भाजपा मनसेला सोबत घेईल, असं ते कोल्हापुरात बोलताना म्हणाले.

“परप्रांतीय कामगार हे पाकिस्तानातून आलेले नाही. त्यांच्या राज्यात त्यांना रोजगार उपलब्ध नसल्याने ते लोक महाराष्ट्रात येतात. त्यामुळे परप्रांतीयांना राज्यातून हुसकावून लावण्याची भूमिका जर राज ठाकरे यांनी बदलली, तर त्यांचासारखा नेताच नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जर परप्रांतियांना विरोध करण्याची भूमिका बदलली, तर भाजपा नक्कीच मनसेला सोबत घेईल”, असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं.

“राज्यातील सरकार भाजपा पडणार नाही. मात्र अंतर्गत कलहातूनच ते सरकार पडेल असे चित्र आहे. आणि जेव्हा असं दिसत असेल, तेव्हा आम्ही नक्कीच भजन करत शांत बसणार नाही. मध्य प्रदेशसह काही राज्यात अंतर्गत वादातून सत्तेतील पक्षात दुभंग झाल्यानंतरच भाजपाने तेथे सत्ता स्थापन केली होती हे साऱ्यांनी लक्षात ठेवायला हवे”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.